नाशिक/एनजीएन नेटवर्क
डॉ. मो. स. गोसावी हे शिक्षण क्षेत्रात दीपस्तंभ ठरलेले आणि आपल्या कार्यकर्तृत्वातून ते समाजासमोर आदर्श राहिले. डॉ. गोसावी यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रातील एक मार्गदर्शक हरपल्याची भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त झाली. गोखले शैक्षणिक संस्थेच्या ‘गुरुदक्षिणा’ सभागृहात आयोजित सभेत मान्यवरांनी उजाळा दिला.
पालकमंत्री दादा भुसे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, गोखले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एस. बी. पंडित , संस्थेच्या मनुष्यबळ संचालक प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, संस्थेचे विभागीय सचिव राम कुलकर्णी, संस्थेच्या उपाध्यक्षा प्राचार्या डॉ. सुहासिनी संत , प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, संस्थेचे आस्थापना संचालक शैलेश गोसावी, कल्पेश गोसावी, प्रकल्प संचालक, सरांचे जावई प्रदीप देशपांडे, गोसावी आणि देशपांडे परिवाराचे सदस्य, अध्यापक आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भुसे यांनी संस्थेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांचे जीवन घडविले असल्याचे सांगितले. आमदार फरांदे यांनी सरांनी या संस्थेला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले असून शिक्षण संस्थेचे संचालक कसे असावे, याचा वस्तुपाठ घालून दिल्याचे सांगितले. आमदार हिरे यांनी नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व या तीनही क्षेत्रातील सरांचे मोठेपण व्यक्त केले. केंद्रीय समन्वय समितीचे शाळा विभागाचे समन्वयक विनोद देशपांडे, भि.य.क्ष. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, बीवायके महविद्यालयाचे निबंधक गिरीश नातू, अतुल चांडक, के. आर. शिंपी, ॲड. जयंत जायभावे, लक्ष्मीकांत जोशी, सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, मविप्र संस्थेचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनीहीमनोगत व्यक्त केले.
विश्वस्त प्राचार्य डॉ. आर. पी. देशपांडे यांनी सरांच्या निधनाने आलेली पोरकेपणाची भावना व्यक्त केली. संस्थेच्या मानव संसाधन संचालिका प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी सरांची उर्वरित कामे पूर्ण करण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष एस. बी. पंडित यांच्या श्रद्धांजलीने सभेचा समारोप झाला.