NGN News
Latest Marathi News

60 कोटींची फसवणूक; सेलेब्रिटी दांपत्याविरोधात लूकआउट नोटीस

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

एका व्यावसायिकाची 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लूकआउट नोटीस जारी केली आहे. कुंद्रा यांच्या बंद पडलेल्या बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडच्या गुंतवणूक कराराशी संबंधित हे आरोप करण्यात आले. 

दीपक कोठारी या व्यावसायिकाने कुंद्रा पती-पत्नीवर हे आरोप केले आहेत. त्यांनी असे आरोप केले आहेत की, 2015 ते 2023 दरम्यान या जोडप्याने त्यांच्याकडून व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी 60 कोटी रुपये घेतले, पण त्या पैशांचा वापर त्यांनी वैयक्तिक खर्चासाठी केला. बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे त्यांनी ही रक्कम घेतली होती. जोडप्यावर असा आरोप आहे की, या जोडप्याने पैसे कर्ज म्हणून घेतले होते परंतु नंतर कर बचत करण्याचा हवाला देत ते गुंतवणूक म्हणून दाखवले. कोठारी यांच्या मते, त्यांना आश्वासन देण्यात आले होते की पैसे एका विशिष्ट वेळेत 12% वार्षिक व्याजासह परत केले जातील आणि एप्रिल 2016 मध्ये शिल्पाने त्यांना वैयक्तिकरित्या लेखी हमी दिली होती. परंतु काही महिन्यांतच तिने फर्मच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. जुहू पोलिसांनी शिल्पा आणि राजविरोधात फसवणूक आणि बनावटगिरीच्या कलमांखाली 14 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात फसवणुकीची रक्कम 10 कोटींपेक्षा जास्त असल्याने हे प्रकरण ईओडब्ल्यूकडे वर्ग करण्यात आले.

Comments are closed.