नाशिक रोड : एनजीएन न्यूज नेटवर्क
ताई, तू मला सकाळी राखी बांध, मी तुला गिफ्ट देईन.. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी बहीण श्रेयाशी संवाद साधणाऱ्या तीन वर्षीय आयुषचा बिबट्याने बळी घेतल्याने अवघे वडनेर गाव हळहळले. या गावात वास्तव्यास असलेल्या भगत कुटुंबियांच्या घरात शुक्रवारी सायंकाळी बिबट्या शिरला आणि होत्याचे नव्हते झाले. कारण बिबट्याने या कुटुंबियांच्या लहानग्याला यमसदनी धाडले.
या अत्यंत हृदयद्रावक घटनेने पंचक्रोशीत दुखाचे सावट निर्माण झाले. भगत यांचे घर शेतात असल्याने रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरात बिबट्या केव्हा आला ते कळलेही नाही. जेवायला म्हणून आयुषला हाक मारली असता प्रतिसाद न मिळाल्याने त्याची शोधाशोध सुरु झाली. यामध्ये ग्रामस्थ, वन विभाग, श्वान पथक, पोलीस कर्मचारीही सहभागी झाले. तीन तासानंतर रक्तबंबाळ अवस्थेतील आयुषचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडला. ते पाहून कुटुंबियांसह सर्वांनाच धक्का बसला.
मनगटावर राखी, मग अंत्यसंस्कार …
ताई, तू मला सकाळी राखी बांध. मी तुला गिफ्ट देईन, असा शब्द दिलेला लहानगा आयुष सोडून गेल्याने त्याची दहा वर्षांची बहिण श्रेयाच्या अश्रूंचा बांधू फुटला. मृत भावाच्या मनगटावर श्रेयाने राखी बांधली. त्यानंतर आयुषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिमुकल्या श्रेयाला राखी बांधताना पाहून उपस्थित प्रत्येक जण हळहळला.
Comments are closed.