मुंबई/एनजीएन नेटवर्क
ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा.हरी नरके यांच्या निधनाने माझा वैचारिक आधारस्तंभ हरपला असल्याच्या शोकभावना व्यक्त करतांना महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांना अश्रू अनावर झाले. यावेळी ‘हरी तुला आम्ही तुला मरू देणार नाही, तू सुरु केलेलं काम आम्ही नेटाने पुढे नेऊ’ अशा शोकसंवेदना त्यांनी व्यक्त केल्या.
ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांचे दि.९ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुंबई एज्युकेशन ट्रस्ट,भुजबळ नॉलेज सिटी, बांद्रा मुंबई येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेस सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, पत्रकारिता, कला आदी क्षेत्र यांसह सर्वपक्षीय राजकीय मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रा.हरी नरके यांच्या पत्नी संगीता, मुलगी प्रमिती व नरके कुटुंबीय, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह संपूर्ण भुजबळ कुटुंबीय, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, प्रा.हरी नरके हे लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि ओबीसी चळवळीचे खंदे कार्यकर्ते होते. तब्बल ५५ पेक्षा अधिक पुस्तके आणि शोधनिबंध लिहिले. देशासह जगभरातील ६० हून विद्यापाठातील चर्चामध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले होते. त्यांचे विविध वर्तमानपत्र, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून १०० पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले होते. फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारासाठी कोणाशीही भांडायला तयार होते. आपला विचार नव्या पिढी पर्यंत पोहचवायचा असेल तर नव्या पिढीची जी माध्यमे आहेत त्या मार्गाने आपण सुद्धा जायला हवे असा विचार करणारे ते होते असे त्यांनी सांगितले.
एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले नरके यांनी पुण्यात येऊन अगदी स्मशानभूमीत देखील काम केले. पुण्यातील नामांकित अशा टेल्को कंपनीची नोकरी महात्मा फुले यांच्या विचारासाठी त्यांनी सोडली. पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते. तसेच पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष पद त्यांनी भूषविल. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, प्रबोधनाच्या चळवळीत काम करायचे असेल तर सुरवात स्वतः पासून करावी लागते म्हणूनच हरी नरके यांनी आंतरजातीय विवाह केला. विवाहमध्ये स्वतः पु.ल देशपांडे यांनी मदत केली होती या आठवणीना त्यांनी उजाळा दिला.
ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घरात लावला म्हणून लहान असताना ज्या हरी नरके यांना त्यांच्या मामांनी मारले होते. त्याच हरी नरके यांनी नामांतराच्या लढयात उडी घेतली आणि २२ दिवस ठाणे कारागृहात कारावास भोगला.आजही या मनुवादीवृत्ती फोफावत चालल्या आहेत असे दिसले तेव्हा प्रा. हरी नरके, उत्तम कांबळे आणि रावसाहेब कसबे हे बाहेर पडले आणि महाराष्ट्र पिंजून काढत तब्बल २५ पेक्षा अधिक सभा घेतल्या घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रा.हरी नरके हे आयुष्यभर फुले, शाहू, आंबेडकर यांचे जीवन जगले. ते आम्हा सर्वांना पुरोगामी चवळीतला एक तेज:पुंज हिरा म्हणून स्मरणात राहतील अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
*यावेळी प्रा.हरी नरके यांची सर्व ग्रंथ संपदा सुमारे २५ हजारांहून अधिक संपदा एकत्र करून मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे प्रा.हरी नरके यांच्या नावाने ग्रंथालय स्थापन करण्यात येईल. दरवर्षी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या इतिहास संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना, शोध पत्रकारिता, गरीब विद्यार्थी, फुले, शाहू व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काम करणाऱ्या समाज सुधारक आणि मागासवर्गीयांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ता यांच्यासाठी एकत्रितपणे हरी नरके यांच्या नावाने ५ लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी याप्रसंगी केली.
ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर म्हणाले की, गेली ३५ वर्ष आमची मैत्री होती. पत्रकारितेत मला महात्मा फुले यांच्या बातमीने प्रसिध्दी दिली त्यामागे प्रा.हरी नरके याचं संशोधन होत.संशोधन क्षेत्रात त्यांनी अतिशय कष्ट करून अनेक संशोधने, सत्य त्यांनी समाजापर्यंत पोहचविले. आपल्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. समाजाला आणि देशाला वेगळी दिशा देण्याचे काम त्यांनी केल. प्रा.हरी नरके यांच्या निधनाने समाजाची महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे, अशा शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या.
ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार उत्तम कांबळे म्हणाले की, प्रा.हरी नरके यांनी दलित मुक्ती चळवळ, स्त्री मुक्ती चळवळ, एक गाव एक पानवटा, भूमी हीन चळवळ, आदिवासी चळवळ, दलित चळवळ यासह विविध चळवळीत त्यांचा सहभाग होता. पुढे जेव्हाही या चळवळींचा इतिहास होता त्यात हरी नरके यांच्या नावाशिवाय होऊ पूर्ण होऊ शकणार नाही. फुले, शाहू,आंबेडकर हे तीन महापुरुष नसून ती एक विचारधारा आहे ती रुजविण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची केल अशा शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी आमदार कपिल पाटील म्हणाले की, पुरोगामी विचारांवर जेव्हा हल्ला झाले त्यावेळी प्रा.हरी नरके यांनी हे हल्ले परतून लावले. सर्व पुरोगामी चळवळीसाठी ते एक महत्वाचा आधारस्तंभ होते. शाहू फुले आंबेडकर चळवळीचे एक चालत बोलत विद्यापीठ होत. त्यांच्या निधनाने शाहू,फुले, डॉ.आंबेडकर चळवळीचे मोठं नुकसान झालं असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हरीच्या खांद्यावर बसून जाण्याचे आमच वय होत. परंतु तो आमच्या खांद्यावर जाण्याची वेळ आली याचं मोठ दु:ख आहे अशा भावना ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी उपस्थित न राहू शकल्याने ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांच्याकडून व्यक्त केल्या. प्रा.हरी नरके यांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला अशा शोकभावना आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केल्या.
यावेळी आ सचिन अहिर,माजी आमदार तुकाराम बिडकर,सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, प्रा.अर्जुन डांगळे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, सुनील सरदार, प्रा, शंकर बोऱ्हाडे,मुस्लीम ओबीसी संघाचे शब्बीर अन्सारी,डॉ.कैलास कमोद, पार्वतीताई शिरसाठ, डॉ. मिलिंद कसबे, प्रा.दिवाकर गमे, प्रा.कविताताई कर्डक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकभावना व्यक्त करत आदरांजली व्यक्त केली.