सटाणा/एनजीएन नेटवर्क
नाशिक जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात अद्यापही अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला असून दरवर्षी जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आणि इतर सर्व संकटांवर मात करीत मोठ्या कष्टाने पीकांचे उत्पादन घेत असतो. मात्र ऐन हंगामात येणारा अवकाळी पाऊस, गारपीट अशा विविध नैसर्गिक संकटांसह शेतमालाला उत्पादना इतकाही बाजारभाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतीक्षेत्र व शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्य शासनामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविल्या जाणार्या नानाजी देशमूख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेत संपूर्ण नाशिक जिल्हा व बागलाण तालुक्याचा समावेश करा, अशी आग्रही मागणी बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात कृषीमंत्री मुंडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय शेती असून शेती क्षेत्रात बागलाण तालुक्यासह नाशिक जिल्हा जागतिक पातळीवर अग्रेसर आहे. जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आणि इतर सर्व संकटांवर मात करीत मोठ्या कष्टाने पीकांचे उत्पादन घेत असतो. मात्र ऐन हंगामात येणारा अवकाळी पाऊस, गारपीट अशा विविध नैसर्गिक संकटांसह शेतमालाला उत्पादनाइतकाही बाजारभाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतीक्षेत्र व शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. नानाजी देशमूख कृषी संजीवनी (पोखरा) योजने अंतर्गत प्रतिकुल हवामान बदलांशी सुसंगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती किफायतशीर करण्यासाठी वैयक्तिक शेतकरी व शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांचे सशक्तीकरण करणे आदी लाभाच्या बाबींचा समावेश आहे. वर्षभरापूर्वी फक्त मालेगाव तालुक्यातील १४७ गावांचाच या योजनेत समावेश झाला होता, मात्र नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ही योजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. नाशिक जिल्हा हवामान बदलास अतिसंवेदनशिल जिल्हा असून दरवर्षी नैसर्गिक संकटांमूळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान होत असते. या नुकसानीमूळे हतबल झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी दुर्दैवाने आत्महत्याही केल्या आहेत. अशा परिस्थितीत शेती क्षेत्राला उजिंतावस्था प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे.
राज्य शासनाच्या जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमूख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे, पीक संरक्षक उपकरणे, काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे, पेरणी यंत्र, कांदा चाळ, संरक्षक शेती (पॉलिहाऊस, पॉलीटनेल, शेडनेट), फळबाग लागवड, बांबू लागवड, बांबू लागवड, नवीन विहीर, ठिंबक व तुषार सिंचन, वैयक्तिक व सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, पाणी उपसा साधने (पंपसंच, पाईप), बंदिस्त शेळीपालन, परसबागेतील कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडूळ व सेंद्रीय खत निर्मिती, वृक्ष लागवड, भूजल पुर्नभरण यांसह मृद व जलसंधारण कामांचा समावेश आहे. ही योजना बागलाण तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारी असल्याने पोकरा योजनेत बागलाण तालुक्यासह नाशिक जिल्ह्याचा प्रथम प्राधान्याने समावेश करण्याची आग्रही मागणीही यावेळी माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी कृषीमंत्री मुंडे यांच्याकडे केली.