देवळाली आर्टिलरी सेंटर यथील दुर्घटना; सर्वत्र हळहळ व्यक्त
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मंगळवारी रात्री घराच्या ओट्यावरून बिबट्याने ओढून नेलेल्या दोन वर्षीय बालकाचा मृतदेह अखेर १८ तासानंतर बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आर्टिलरीच्या जंगलात आढळून आला. बालकाला पाहताच त्याच्या वडिलांनी हंबरडा फोडला. श्रुतिकचे वडील गंगाधर हे लष्करी जवान असून ते मुळ कर्नाटक राज्यातील आहेत. श्रुतिक हा एकुलता एक मुलगा होता. त्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरा बालकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दीड महिन्यांपूर्वी ज्या वडनेर गेट भागात आयुष भगत नामक तीन वर्षीय बालकाचा बिबट्याने बळी घेतला होता त्याच ठिकाणी म्हणजेच कारगिल गेटच्या बाजूला असलेल्या क्वार्टरजवळ मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमाराला बिबट्याने दोन वर्षाच्या श्रुतिक गंगाधर या बालकावर हल्ला करून त्याला ओढून नेले. बालकाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर त्याचे कुटुंबीय घराबाहेर आले. समोरील दृश्य पाहताच ते हादरले. त्यांच्या आरडओरडीने नागरिक जमा झाले. काही अंतरापर्यंत सर्वांनी बिबट्याचा पाठलाग केला. मात्र, नदीच्या दिशेने बिबट्या पसार झाला.सदर प्रकारामुळे पुन्हा एकदा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित बालकाचा वनविभाग, देवळाली आर्टीलरी सेंटरचे जवान आणि नागरिक यांच्याकडून मध्यारात्रीपर्यंत सुरू होता. शोधकार्यात ड्रोनचीही मदत घेण्यात आली. या प्रकारामुळे नागरिक भयभीत झाले.
Comments are closed.