NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

अभिमानास्पद ! भारताच्या यशाचा सूर्य चंद्रावर उगवला; चांद्रयान-3..

0

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क

देशाच्या इतिहासातली सर्वात गोड, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची बातमी ‘इस्त्रो’ ने देशवासियांना दिली आहे. कारण चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले आहे. इस्रोचे चांद्रयान-3 आज सायंकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले आहे. भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली आहे. 

भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लँडिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली, श्वास रोखले गेले, हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले आणि बातमी आली. चांद्रयान-3 मोहीम फत्ते झाली. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले आणि मनात आनंदाचे धबधधबे फुलून गेले. आपल्याच घरातलं कुणीतरी परीक्षेत फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाल्याची भावना निर्माण झाली. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथे जगातले कुणीच गेलेले नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातली आहे.  भारताच्या चांद्रयानने इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारताची शान चांद्रयान-3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरले आहे. 14 जुलै रोजी पृथ्वीवरुन चंद्राच्या दिशेने निघालेल्या चांद्रयान-3 चा चंद्रापर्यंतचा प्रवास यशस्वी झाला आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे.

संपूर्ण जगाचे लक्ष

संपूर्ण जगाचं लक्ष लागलेली भारताची चंद्रमोहिम यशस्वी ठरली आहे. प्रत्येक भारतीयाची छाती गर्व आणि अभिमानाने फुलून गेली आहे. चांद्रयान-2 मोहिमेत अपशय आल्यानंतरही भारतानं हार मानली नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 2020 मध्यो चांद्रयान-3 मोहिमेला इस्रोकडून सुरुवात करण्यात आली आणि त्याचं फळ आज मिळालं आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता यशस्वी उड्डाण केलं आणि आज या चांद्रयान-3 नं चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केले आहे.

दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यशस्वी

भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यशस्वी ठरले आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव कायम अंधारात असतो. येथील वातावरण अतिशय थंड असते. भारताच्या चांद्रयान-1 ने चंद्रावर बर्फाचा शोध लावला होता. त्यानंतर आता तेथे पाण्याचे साठे शोधणे हे चांद्रयान-3 चं प्रमुख उद्दीष्ट आहे. चंद्रावरील विविध नमुने गोळा करुन त्यावर इस्रोकडून संशोधन करण्यात येणार आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.