** राकेश बोरा
लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
विकास पाटील यांना आज राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने लासलगाव पोलीस ठाण्यात आनंदाचे वातावरण आहे. लासलगाव पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या गौरवाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक मोहन विकास पाटील यांनी, आपण केलेल्या प्रामाणिक आणि धाडसी कामाची ही पावती आहे, अशी भावना व्यक्त केली. ढेकू (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील रहिवासी असलेल्या मोहन पाटील यांचे वडील शेतकरी आहेत. २०२० मध्ये त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. पहिली पोस्टिंग नाशिक शहरात झाली, तर २०२१ मध्ये त्यांची बदली गडचिरोली येथे करण्यात आली.
गडचिरोलीतील अतिसंवेदनशील ताडगाव पोस्टवर त्यांची पहिलीच पोस्टिंग झाली. त्यानंतर छत्तीसगड राज्याच्या सीमेपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नवीन पोलीस मदत केंद्र येथे त्यांनी कर्तव्य बजावले. नक्षलवादाच्या भीतीखाली असलेल्या गावकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे काम केले.
यानंतर गडचिरोली येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकात त्यांनी एक वर्ष सेवा बजावली. या काळात तीन बॉम्ब कॉल यशस्वीरीत्या अटेंड करून मोठा अनर्थ टाळण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. सध्या मोहन पाटील हे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असून, राष्ट्रपती पदकाच्या घोषणेमुळे त्यांच्या कार्याला नवी उर्जा मिळाल्याचे सहकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
Comments are closed.