NGN News
Latest Marathi News

विंचुर उपबाजारासाठी लासलगाव बाजार समितीला ८.६१ हेक्टर जागा मंजूर

शासकीय दराने सुभाषनगर येथील जागेचा ताबा; शेतीमालासाठी सुविधा केंद्र उभारणार

लासलगाव : राकेश बोरा

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचुर उपबाजार विस्तारासाठी मोठी बाब घडली असून राज्य शासनाने सुभाषनगर ग्रामपंचायत हद्दीतील ८ हेक्टर ६१.५६ आर शासकीय जागा बाजार समितीस नाममात्र एका रुपयात मंजूर केली आहे. ही माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप आणि उपसभापती संदीप दरेकर यांनी दिली.

सध्या विंचुर येथे कार्यरत असलेल्या उपबाजार आवारात कांदा, भुसार व तेलबिया शेतीमालाची लिलाव प्रक्रिया सुरू आहे. समितीने याआधीच २ हेक्टर ४० आर स्वतःची जागा खरेदी करून मूलभूत सुविधा उभारल्या आहेत. परंतु दिवसेंदिवस व्यापारी व शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढल्याने जागा अपुरी पडत होती.या पार्श्वभूमीवर तत्कालीन सभापती  सुवर्णा जगताप आणि सदस्य मंडळाने सुभाषनगर परिसरातील जागा संपादनासाठी २०२१ मध्ये महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. यानंतर राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.शेवटी ६ ऑगस्ट २०२५ रोजी शासनाने या जागेची मंजुरी दिली असून ती उपबाजाराच्या सार्वजनिक उपयोगासाठी देण्यात आली आहे. 

या जागेवर आधुनिक सोयीसुविधांसह बाजार आवार, वॉल कंपाऊंड, काँक्रीटीकरण, भुईकाटा, पिण्याचे पाणी, निवास व्यवस्था, कार्यालयीन इमारती इत्यादी उभारल्या जाणार आहेत. या ठिकाणी कांद्यासह भुसार, तेलबिया, बेदाणा, फळे व भाजीपाला यांचा लिलाव सुरू केला जाणार आहे.

या जागा मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पणन मंत्री जयकुमार रावल, सचिव नरेंद्र वाढवणे, प्रकाश कुमावत,तसेच बाजार समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत प्रतिनिधी व महसूल अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे जगताप यांनी सांगितले

Comments are closed.