नाशिक/एनजीएन नेटवर्क
द्राक्ष व फलोत्पादन निर्यातीत आघाडीवर असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने कोकण व आदिवासी पट्ट्यातील महत्वाचे पिक असलेल्या काजूच्या मुल्यसाखळी उभारणीवरही भर देण्यास सुरवात केली आहे. कंपनीच्या मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स कॅम्पस मध्ये प्रतिदिन तब्बल 100 टन क्षमतेचा काजू प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. काजू निर्मितीबरोबरच काजू कवचापासून तेल निर्मितीही सुरु करण्यात आली आहे. राज्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्टयातील भागाचे अर्थकारण उंचावण्यास यामुळे मदत होणार आहे.
या विषयी अधिक माहिती देतांना सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे म्हणाले की, जगात काजू उत्पादनात भारत म्हणून आपण जगात आघाडीवर असलो तरीही देशांतर्गत असलेली काजूची मागणीही आपण पूर्ण करु शकत नाही. इतकी या शेतीत व व्यापारात वाढीला संधी आहे. महाराष्ट्रात कोकणाबरोबरच सह्याद्रीच्या पर्वतरांगातील घाटमाथ्यावरील इतरही भागात काजूमुळे आर्थिक क्रांती घडवण्याची संधी आहे. या संधीचे रुपांतर ताकदीच्या मुल्यवर्धित साखळीत करण्याची गरज आहे. त्यासाठी ‘सह्याद्री’ने ही सुरुवात केली आहे.
काजूची सरासरी उत्पादकता वाढविण्याबरोबरच दुसरीकडे काजू गर व बोंडापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचे मोठे प्रकल्प उभारण्यावर भर देणे गरजेचे आहे. यातून केवळ काजू उत्पादक शेतकऱ्यांचेच उत्पन्न वाढणार नाही तर गावातच रोजगाराची संधी निर्माण झाल्यामुळे रोजगारासाठी शहरात गेलेला तरुणवर्ग पुन्हा गावांत स्थिरावणार आहे. इतकी क्षमता यात आहे. त्यासाठी काजू पिकाच्या मुल्यसाखळ्या उभ्या करण्यावर ‘सह्याद्री फार्म्स‘ भर देणार आहे.
@ ‘सह्याद्री’चा काजू प्रक्रिया प्रकल्प
- प्रति दिनी 100 टन कच्चे काजू हाताळणीची क्षमता
- * देशातील टॉप 10 मधील आणि राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प
- * प्रक्रियेची सर्व यंत्रणा एकाच ठिकाणी *
- काजू कवचापासून तेल काढणीचा 20 टन क्षमतेचा प्लॅन्ट
- उत्पादन गुणवत्तेच्या बीआरसी उच्च मानकांच्या समकक्ष व्यवस्थापन
- परिसरातील 300 हून अधिक महिलांना कायमस्वरुपी रोजगार