नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक जिल्ह्यात आयटी पार्क प्रकल्पासाठी 100 एकर तसेच इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी दिंडोरी तालुक्यातील आक्रळे येथे दोनशे एकर जागेचे आरक्षण लवकरच होईल, अशी घोषणा खा. हेमंत गोडसे यांनी केली. शिलापूर येथे शंभर एकर जागेत साकारलेल्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचे उद्घाटन नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होईल असेही गोडसे पुढे म्हणाले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड अँग्रीकल्चरतर्फे आयोजित मायटेक्स्पो 2023 या प्रदर्शनाचे उद्घाटन खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते तसेच आ.सीमाताई हिरे, आ.देवयानी फरांदे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा, करुणाकर शेट्टी, नितीन बंग, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा,विश्वस्त विलास शिरोरे, खुशालभाई पोद्दार, प्रायोजक दीपक चंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी गोडसे बोलत होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित या प्रदर्शनामुळे उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल. उत्तर महाराष्ट्राचे द्वार म्हणून या एक्सपोला विशेष महत्त्व आहे. नाशकात लवकरच रेल्वेच्या रिपेअर कारखाना साकारणार असून त्याचे उद्घाटनही लवकरच होणार आहे. रेल्वे वेंडर्सना त्याचा निश्चितच लाभ होईल, असे गोडसे पुढे म्हणाले. दिल्ली- मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये पहिल्या टप्प्यात नाशिकचा समावेश झाला नाही. मात्र दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणले.
चेंबर ऑफ कॉमर्सने उद्योजकांना नेहमीच प्रोत्साहन देते ही भूषणावह बाब आहे. प्रदर्शनामुळे नव उद्योजकांसाठी निश्चितच महत्वाचे दालन खुले होणार आहे असे प्रदर्शन महाराष्ट्रभर भरवावे, अशी अपेक्षा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आ. सीमाताई हिरे यांनी व्यक्त केली. उत्तर महाराष्ट्रातील व्यापारी व उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर नेहमीच पुढाकार घेते. नाशकात लवकरच आयटी हब साकारणार असून त्यामुळे रोजगारासाठी तरुणांना अन्यत्र जाण्याची आवश्यकता भासणार नाही असे चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नमूद केले.
प्रास्ताविक चेंबरचे उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा यांनी केले. चेंबरचे मुंबईनंतरचे हे दुसरे प्रदर्शन आहे. चार दिवसांच्या या प्रदर्शनात अनेक देशांचे कौन्सुलेट जनरल भेटी देणार आहेत. प्रदर्शन बघण्यास येणाऱ्यांसाठी बक्षिसांची लयलूट असून चार दिवसात अकरा लाखांची पारितोषिके दर तासाला लकी ड्रॉ द्वारे वितरित केले जाणार असल्याचे चोपडा यांनी यावेळी नमूद केले. या शृंखलेतील तिसरे आणि दहा दिवसांचे प्रदर्शन पुणे येथे होणार असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. या प्रदर्शनामुळे उत्तर महाराष्ट्रासाठी प्रगतीचे द्वार खुले होईल, असा विश्वास प्रदर्शनाचे चेअरमन संजय सोनवणे यांनी व्यक्त केला. सर्व क्षेत्रातील व्यापारी आणि उद्योजकांसाठी सर्व समावेशक असे हे प्रदर्शन असल्याने सर्वांना ते निश्चितच आवडेल, असेही सोनवणे पुढे म्हणाले. आभार प्रदर्शन वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांनी केले.
प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी निमा अध्यक्ष धनंजय बेळे, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, कार्यकारणी सदस्य संदीप भंडारी, ललित नहार, रवी जैन,निलेश चव्हाण, प्रकाश कलंत्री, नीलिमा पाटील दिपाली चांडक मिथिला कापडणीस, भरत येवला, राजेंद्र कोठावदे, भावेश मानेक, राजेश मालपुरे, अंजु सिंघल, सचिन जाधव, सौ. सुनीता फाल्गुने, स्वप्नील जैन, संदीप सोमवंशी सचिव विनी दत्ता आदींसह कार्यकारिणी सदस्य, व्यापारी, उद्योजक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते