नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
जमिनीच्या मोबदल्यात नोकरी प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी ईडीने लालू यादव यांच्या कुटुंबीयांची सहा कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
या प्रकरणी राजदचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची चौकशी सुरू आहे. नुकतेच सीबीआयने या तिघांविरोधात आरोपपत्रही दाखल केले होते.
गेल्याच महिन्यात सीबीआयने दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टात लालूप्रसाद यादव कुटुंबियांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. रेल्वेत नोकरीच्या मोबदल्यात लाचेने जमीन घेतल्याच्या आरोपांची सीबीआय चौकशी करत आहे. दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. या प्रकरणी सीबीआयने आरोपपत्रही दाखल केले आहे. लालू यादव यांचे निकटवर्तीय आणि माजी आमदार भोला यादव आणि हृदयानंद चौधरी हेदेखील या प्रकरणात आरोपी आहेत.