- हातावर सुसाईड नोट लिहून साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या
सातारा : एनजीएन न्यूज नेटवर्क
उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या धक्कादायक घटना साताऱ्यातील फलटण शहरात उघड झाली आहे. डॉ. संपदा मुंडे असे या डॉक्टरचे नाव आहे. पोलीस निरिक्षक गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर या दोन जणांनी शारीरिक, मानसिक छळ केल्याचे डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून ठेवल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, काही महिन्यांपासून डॉ. संपदा मुंडे ह्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी वादानंतर त्यांची चौकशी सुरू होती. या चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी स्वरूपात तक्रार देत म्हटले होते की, माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन. या तणावामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तथापि, त्यांच्या या तक्रारीकडे वरिष्ठांकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही, असा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जात आहे.
“माझ्या मरणास पोलीस निरिक्षक गोपाल बदने जबाबदार आहे, ज्याने ४ वेळा माझ्यावर अत्याचार केले. तसेच, पोलीस प्रशांत बनकर यानेही मागच्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला”, असे डॉ. संपदा मुंडे यांनी आपल्या ‘सुसाईड नोट’मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. यानंतर पोलिसांकडून गोपाळ बदनेचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे.
Comments are closed.