नवीन नाशिक/एनजीएन नेटवर्क
‘वर्क फ्रॉम होम’चे लक्ष्य देवून महिलेकडून तब्बल १८ लाख रुपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार नवीन नाशिक भागातील खुटवड नगर येथे उघड झाला आहे. संबंधित महिलेला प्रश्नावली देऊन आणि वारंवार बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून ही फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये चोवीस बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नवीन नाशिक परिसरातील खुटवड नगर येथील एका ३२ वर्षे महिलेने यासंदर्भात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार महिला मोबाईलवर ब्राउझिंग करत होती. याच वेळी ‘वर्क फ्रॉम होम करा आणि काही दिवसात लाखो रुपये कमवा’, अशी जाहिरात तिला आपल्या मोबाईलवर आढळून आली. पैसे कमावण्याच्या उद्देशाने संबंधित महिलेने मार्चमध्ये ही वर्क फ्रॉम होमची ऑफर स्वीकारली. यासाठी त्यांना पाठवलेल्या लिंकवर तांत्रिक पूर्तता केली. त्यानंतर त्यांना एका बँक खात्यावर ऑनलाईन पैसे भरण्यास सांगून काही प्रश्न पाठवण्यात आले. ही प्रश्नावली भरत असताना त्यांच्या मोबाईल लिंकिंग असलेल्या टेलिग्रामच्या खात्यात रीव्ह्यू पूर्ण केल्याचे गुण दाखवून बदल्यात रक्कम क्रेडिट होत असल्याचे दाखवण्यात आले. दरम्यान, खात्यात पैसे जमा होत असल्याची खात्री पटल्याने फिर्यादी महिलेने महिनाभर रिव्ह्यू पूर्ण करण्यासाठी संशोधन सांगितल्यानुसार ३ ते २७ मार्च या कालावधीत विविध २४ बँक खात्यांवर एकूण १८ लाख १८ हजारांची रक्कम भरली. त्यामुळे त्यांना संबंधित संशयितांकडून प्रश्न पाठवण्यात आले. तथापि, आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या काही दिवसांनी लक्षात आले. त्यानंतर सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली.