NGN News
Latest Marathi News

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ जाहीर

  • डॉ. अनिरुद्ध पंडित,आशिष माने,चंद्रमोहन कुलकणी, सयाजी शिंदे, प्रशांत दामले, उस्मान खान यांचा होणार सन्मान

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

मराठी साहित्य, कला, विज्ञान आणि समाजसेवेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा द्वैवार्षिक ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे हा सन्मान सोहळा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे.

डॉ. अनिरुद्ध पंडित (विज्ञान), आशिष माने (साहस), चंद्रमोहन कुलकर्णी (चित्रकला), अभिनेते सयाजी शिंदे (लोकसेवा), अभिनेते प्रशांत दामले (नाट्य) आणि उस्ताद उस्मान खान (संगीत) यांना यंदाचा ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. ₹२१,००० रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तात्यासाहेब शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानला जातो. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ कवी व साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

कुसुमाग्रजांच्या विचारांचा वारसा जपणारा पुरस्कार
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कवी प्रकाश होळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की,
“साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवा जपणाऱ्या कुसुमाग्रजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. समाजासाठी निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि सातत्याने काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणे, हेच या पुरस्कारामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.” पत्रकार परिषदेस ॲड. अजय निकम, ॲड. राजेंद्र डोखळे, डॉ. दिलीप धोंगडे (सल्लागार), लोकेश शेवडे, ॲड. विलास लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कारार्थींचा सविस्तर परिचय
डॉ. अनिरुद्ध पंडित – विज्ञान
डॉ. अनिरुद्ध पंडित हे भारतातील जागतिक कीर्तीचे रसायन अभियांत्रिकी शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. कॅविटेशन इंजिनिअरिंग, मल्टिफेज रिऍक्टर डिझाइन आणि बबल डायनॅमिक्स या क्षेत्रातील त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहे.
ब्रिटनमधील University of Cambridge येथे त्यांनी संशोधन सहकारी म्हणून कार्य केले. सध्या ते Institute of Chemical Technology (ICT), मुंबई येथे कुलगुरू (Vice-Chancellor) म्हणून कार्यरत आहेत.
रंकाळा तलाव (कोल्हापूर) आणि बिंदुसागर तलाव (भुवनेश्वर) यांसारख्या तलावांच्या शुद्धीकरणासाठी त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान पर्यावरण संवर्धनासाठी मैलाचा दगड ठरले आहे.
त्यांच्या नावावर ४०० पेक्षा अधिक संशोधन पेपर्स आणि ५० हून अधिक पेटंट्स आहेत.
पर्यावरण संरक्षण, पाणी शुद्धीकरण, ऊर्जा कार्यक्षमता आणि ग्रामीण तंत्रज्ञान यासाठी त्यांनी दिलेले योगदान समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
आशिष माने – साहस
महाराष्ट्रातील साहसी युवकांसाठी प्रेरणास्थान ठरलेले नाव म्हणजे आशिष माने. पुण्यातील कोथरूड येथून शिक्षण घेतलेल्या आशिष माने यांनी संगणक विज्ञानात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असले, तरी त्यांच्या जीवनाची खरी ओळख गिर्यारोहण आहे.
नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग, उत्तरकाशी येथून प्रशिक्षण घेतलेल्या आशिष माने यांनी –
🏔️ एव्हरेस्ट (२०१२)
🏔️ ल्होत्से (२०१३)
🏔️ मकालू (२०१४)
🏔️ मनास्लू
🏔️ कांचनजंगा (२०१९)
ही ८००० मीटरहून उंच पाच शिखरे सर करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव गिर्यारोहक आहेत.
युवकांमध्ये साहस, आत्मविश्वास आणि निसर्गप्रेम जागवण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत.
चंद्रमोहन कुलकर्णी – चित्रकला
मराठी साहित्यविश्वातील असंख्य पुस्तकांची मुखपृष्ठे ज्यांच्या चित्रांनी समृद्ध केली, असे नाव म्हणजे चंद्रमोहन वासुदेव कुलकर्णी.
अभिनव कला महाविद्यालयातून उपयोजित कलेचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी चित्रकलेत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. साहित्याचा गाभा ओळखून तो दृश्य माध्यमातून प्रभावीपणे मांडणे, ही त्यांची खासियत आहे.
‘कॉल ऑफ द सीज’, ‘चाइल्डहूड लॉस्ट’, ‘प्रकृती-पुरुष’ अशा चित्रमालिकांनी त्यांनी रसिकांची मने जिंकली. कोळी समाजाचे जीवन त्यांनी कॅनव्हासवर अत्यंत प्रभावीपणे साकारले आहे.
सयाजी शिंदे – लोकसेवा
पडद्यावर कडक, रौद्र भूमिका साकारणारे सयाजी शिंदे प्रत्यक्ष आयुष्यात मात्र पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.
‘सह्याद्री देवराई’ या संस्थेमार्फत त्यांनी महाराष्ट्रात ४० हून अधिक ठिकाणी वृक्षलागवड केली आहे. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणात त्यांच्या पुढाकारामुळे हजारो झाडे वाचली.
निसर्गासाठी झटणारा कलाकार म्हणून ते समाजासाठी आदर्श ठरत आहेत.
प्रशांत दामले – नाट्य
मराठी रंगभूमीचा जिवंत इतिहास म्हणजे प्रशांत दामले. ‘टूरटूर’पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आजपर्यंत १२,५०० पेक्षा अधिक नाट्यप्रयोगांपर्यंत पोहोचला आहे.
‘मोरुची मावशी’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘गेला माधव कुणीकडे’ यांसारखी नाटके अजरामर झाली. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या नावावर पाच विक्रम नोंदले गेले आहेत.
आज ते अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
उस्ताद उस्मान खान – संगीत
सतारवादनातील स्वतंत्र शैली निर्माण करणारे उस्ताद उस्मान खान हे भारतीय शास्त्रीय संगीताचे आंतरराष्ट्रीय दूत आहेत.
भारतासह युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया खंडात त्यांच्या सतारवादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले आहेत. फ्रान्समधील २४ तास चाललेल्या स्वरयज्ञात निवड होणारे ते मोजके कलाकारांपैकी एक आहेत.
सध्या ते मलेशियातील Temple of Fine Arts चे इंटरनॅशनल डीन म्हणून कार्यरत आहेत.
संस्कृती, समाज आणि विचारांचा गौरव


Comments are closed.