ग्रामपंचायत भार्डी नाव कमी करून कोंढार नाव लावण्याचे विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांचे निर्देश
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मूळ नाव एक आणि कागदोपत्री वेगळेच अशा कात्रीत सापडलेल्या नांदगावमधील एका गावामागील शुक्लकाष्ट अखेर संपुष्टात आले आहे. तालुका तहसीलदार आणि प्रशासनाच्या तत्पर कृतीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर ‘भार्डी’ चे ‘कोंढार’ असे नामकरण झाल्यानंतर आता या गावाला खऱ्या अर्थाने गावपण मिळाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये उमटली आहे.
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीपैकी एक ग्रामपंचायत म्हणजे भार्डी. १९६६ मध्ये भार्डी ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन कोंढार गाव स्वतंत्रपणे ओळखायला लागले. परंतु यात ग्रामपंचायत च्या मालकीच्या गटांमधील भोगवटादारांच्या नावाच्या ठिकाणी भार्डी हे जुनेच नाव कागदपत्र लागले होते. म्हणजे गावाचे नाव कोंढार, परंतु कागदपत्रावर ग्रामपंचायत भार्डी. यामुळे अनेक ठिकाणी कागदपत्रांच्या अडचणी येऊ लागल्या. विविध योजनांचे लाभ घेताना हे नाव अडथळा ठरू लागले, यावर कायमस्वरूपीचा मार्ग काढणे गरजेचे होते. यासाठी तहसीलदार नांदगाव ,गटविकास अधिकारी नांदगाव,ग्रामपंचायत कोंढार,ग्रामपंचायत भार्डी यांनी यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता केली. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनीही सकारात्मक अहवाल दिला होता. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावातील कागदपत्रांची छाननी करून स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित ग्रामपंचायत भार्डी हे नाव कमी करून ग्रामपंचायत कोंढार हे नाव भोगवटादारांच्या सदरी दाखल करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले. तहसीलदार नांदगाव सुनील सैंदाणे यांनी तात्काळ बदलाचे आदेश निर्गमित केले. पन्नास वर्षांनी न्याय मिळाल्याची भावना कोंढार ग्रामस्थांनी व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.
ग्रुप ग्रामपंचायत कोंढार हद्दीतील परंतु ग्रुप ग्रामपंचायत भार्डी हे नाव दप्तरी लागलेल्या गट नंबर ८१/०१,८४,११८,१४७,१६३, १६४,२११,२१३,२३४,२३६ यांच्या उताऱ्यावर आता ग्रामपंचायत कोंढार हे नाव लागणार आहे.
— डॉ. प्रवीण गेडाम
विभागीय आयुक्त,नाशिक विभाग
Comments are closed.