NGN News
Latest Marathi News

कोकाटे यांची गच्छंती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संघटनेसाठी हादरा

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्षम नेतृत्वावर गंडांतर; अजित पवार यांच्या चिंतेत भर

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

विद्यार्थीदशेपासून नेतृत्वगुण असलेल्या आणि थेट मंत्रीपदावर जावून पोहचलेल्या माणिकराव कोकाटे यांना अखेर आपले मंत्रिपद सोडावे लागले. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या राखीव कोट्यातून घेतलेल्या चार सदनिकांच्या घोटाळयाप्रकरणी कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाल्यानंतर त्यांना राजीनामा देण्याची अपरिहार्यता स्वीकारावी लागली. जिल्ह्यात निवडणुकीची धामधूम सुरु असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर कोसळलेले हे अनपेक्षित संकट पक्षासाठी एक धक्का मानला जात आहे. कोकाटे हे आता बिगर खात्याचे मंत्री असणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष आताच्या महापालिका आणि पाठोपाठ येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका कशा पद्धतीने लढतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सात आमदार असल्याने या पक्षाचा ग्रामीण राजकारणावर मोठा प्रभाव आहे. माणिकराव कोकाटे सिन्नरमधून पाचव्यांदा निवडून आल्यानंतर थेट छगन भुजबळ यांना डावलून त्यांची मंत्रीपदावर वर्णी लागली होती. कालौघात, भुजबळ यांना मंत्रिपद दिले गेले गेले असले तरी जिल्ह्यात आक्रमक मराठा नेतृत्व म्हणून कोकाटे यांना पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी नेहमीच प्राधान्य दिले. मात्र, आधी वादग्रस्त वक्तव्ये आणि विधिमंडळात रमी खेळण्याच्या मुद्द्यावरून कोकाटे यांचे कृषीमंत्रीपद गेले आणि आता सदनिका घोटाळयाप्रकरणी त्यांची क्रीडामंत्रीपदावरून गच्छन्ति झाली. हा पक्षाला मोठा धक्का मनाला जात आहे. पक्षाचे दुसरे मंत्री भुजबळ यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाल्याने ते जायबंदी आहेत, तर तिसरे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दिंडोरी वगळता जिल्ह्यात इतरत्र प्रभाव नाही. अशा परिस्थितीत महायुतीत सातत्याने मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपला हाताळण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सक्षम नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे.

पक्षातील बेकीही चिंताजनक..

जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस वरकरणी बलशाली वाटत असला तरी एकोप्याबाबत मात्र नेहमीच प्रश्नचिन्ह असते. भुजबळ-कोकाटे यांच्यात सख्य नाही. दोहोंना परस्परांचे नेतृत्व मान्य नाही. दोघांनी आमदारकीच्या पाच टर्म घेतल्याने ज्येष्ठत्वाचा मुद्दा पुढे येतो. अशा परिस्थितीत उर्वरित आमदारांपैकी कोणी पक्ष संघटनेसाठी निर्णायक नेतृत्व म्हणून पुढे येणे तूर्तास तरी अशक्य आहे. म्हणूनच पक्षातील बेकी आणि कोकाटे यांची पदावनती यांसोबतच भुजबळ यांचे प्रकृती अस्वास्थ्य या अजित पवार यांच्या चिंतेत भर टाकणाऱ्या गोष्टी ठरणार आहेत.

Comments are closed.