NGN News
Latest Marathi News

वाघ शिक्षण संस्थेकडून जबाबदार नागरिक घडविण्याचे काम : छगन भुजबळ

के के वाघ शिक्षण संस्थेतर्फे आयोजित सत्कार समारंभात गौरवोद्गार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

जग मोठ्या प्रमाणात नवतंत्रज्ञानाकडे वाटचाल करत आहे. त्यात आपल्याला देखील उतरावे लागेल. त्यामुळे त्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी आपण देखील प्रयत्न केले पाहिजे. तसेच शिक्षणा शिवाय पर्याय नाही.  नाशिक हे शिक्षणाचे हब निर्माण व्हायला हवे. त्याचप्रमाणे कर्मवीरांच्या मोठेपणामुळे के के वाघ सारख्या इतर देखील शिक्षण संस्था उभा राहिल्या. कर्मवीरांनी लावलेल्या रोपट्याचे ५५ वर्षांत वटवृक्षात निर्माण झाले आहे. तसेच संस्था विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याबरोबरच जबाबदार नागरिक घडविण्याचे काम करत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

के के वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे आयोजित सत्कार  व मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार दिलीप बनकर यांनी भुषविले. या प्रसंगी माजी आमदार नानसाहेब बोरस्ते, माजी नगरसेवक नाना महाले, लासलगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती डी. के जगताप, वामन खोसकर, संस्थेचे विश्वस्त चांगदेवराव होळकर, जनसंपर्क संचालक अजिंक्य बाळासाहेब वाघ, विलास टर्ले, धनंजय होळकर, सुरेश शेटे, सुरेश भोज आणि जिल्ह्यातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

ऑनलाईन माध्यमातून महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व कृषी महाविद्यालयाचे संस्थाचालक व प्राचार्य व पदाधिकारी तसेच शैक्षणिक, सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील ९०० हून अधिक मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात संस्था गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांकडून  दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर यांनी मांडले. प्राचार्य डॉ. भूषण कर्डिले यांनी प्रमुख मान्यवरांचा परिचय केला.

संस्थेचे अध्यक्ष मा. समीर बाळासाहेब वाघ यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित आमदार यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत सत्कार केला. तसेच संस्थेचे जनसंपर्क संचालक मा. अजिंक्य बाळासाहेब वाघ यांनी उपस्थित मान्यवर यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे नंतर कै. बाळासाहेब (भाऊ) वाघ यांनी आदर्शवत काम केलेले आहे. तसेच आजचे सत्कारमुर्ती नामदार छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात विकासाची गंगा निर्माण केली आहे. तसेच सरकारमध्ये जेष्ठ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करत असल्याचे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार दिलीप बनकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पवार यांनी केले. तसेच मा. अजिंक्य बाळासाहेब वाघ आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. 

Comments are closed.