डॉ. मिताली सेठी यांच्यावर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी सध्या त्यांच्या एका निर्णयामुळे राज्यभर चर्चेत आहेत. सेठी यांनी स्वतःच्या जुळ्या मुलांना सरकारी शाळेत प्रवेश दिल्याने त्या सर्वसामान्यांच्या प्रशंसेस पात्र ठरत आहेत. नंदुरबार शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील टोकर तलाव अंगणवाडीत त्यांनी आपल्या जुळ्या मुलांना शालेय जीवनाची पूर्वकल्पना देणाऱ्या आणि शिस्तीचे महत्त्वाचे निकष बालवयातच पटवून सांगणाऱ्या या सामन्यांच्या ज्ञानमंदिरात पाठवयला सुरुवात केली आहे.
टोकर तलाव येथील या अंगणवाडीत सेविका आणि मदतनीसांनी तयार करुन घेतलेल्या ‘झोळी’ची कल्पना आवडल्याने आपल्या ‘शुकर’ आणि ‘सबर’ या जुळ्या मुलांना टोकर तलावच्या अंगणवाडीत प्रवेश घेतला, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी दिली. याठिकाणी शाळा आणि अंगणवाडी एकाच प्रांगणात असल्याने दोन्हीवर लक्ष तर राहीलच, शिवाय जिल्ह्यातल्या इतर अंगणवाडीमध्ये देखील काय सुधारणा करता येईल याबाबत देखील जातीने लक्ष घालता येईल, या उद्देशानेचे मुले अंगणवाडीमध्ये घातल्याचे जिल्हाधिकारी सेठी यांनी स्पष्ट केले. डॉ. मिताली सेठी या ऑगस्ट २०२४ मध्ये नंदुरबार जिल्हाधिकारीपदी नियुक्त झाल्या. तत्पूर्वी त्या वनामती संस्थेच्या संचालिका होत्या.
काय आहे ‘झोळी’ची कल्पना ?
टोकर तलाव येथील अंगणवाडीत सेविका आणि मदतनीसांनी एका शिंप्याच्या मदतीने नाविन्यपूर्ण झोळी बनवली आहे. या अंगणवाडीतील मूल झोळीत बसल्यानंतर ते रडत नसल्याचा अनेकांना अनुभव आला आहे. त्यामागे येथील वातावरण आणि सेविकांची प्रेमळ वागणूक हे घटक महत्वाचे ठरत असल्याचे सांगण्यात येते. हे सगळे प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच आपण मुलांना अंगणवाडीत दाखल केल्याचे डॉ. सेठी म्हणाल्या.
Comments are closed.