डांगसौंदाणे/निलेश गौतम
पावसाळ्याला सुरुवात होऊन दोन महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने एकीकडे उन्हाळ्यात भीषण दुष्काळाची चाहूल लागण्याची चिन्हे असताना दुसरीकडे धरण क्षेत्रात गेली काही दिवस सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे मोसम नदीवरील हरणबारी व आरम नदीवरील केळझर मध्यम लघु प्रकल्प भरल्याने आरम व मोसम खोऱ्यातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
572 दलघफु क्षमतेचे केळझर(गोपाळ सागर)धरण हे आरम खोऱ्यातील 38 गावांच्या शेती सिंचनासह सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविते पश्चिम भागातील गावांना या धरणाच्या पाण्याचा फायदा होतो .गत वर्षी 12 जुलै ला भरलेले केळझर या वर्षी भरते की नाही या चिंतेत शेतकरी सह सर्वसामान्य जनता असताना धरणातील आधीचा 100 द ल घ फु शिल्लक साठा आणि सध्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे या वर्षी हे धरण 7 ऑगस्टला भरले या आधीच मोसम नदीवरील हरणबारी धरण भरले आहे . 1166 क्षमतेचे हरणबारी धरण मोसम नदीवर आहे. या धरणाचा थेट लाभ हा मालेगाव शहराला होतो तर नामपूर सह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्या सह शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होते .
केळझर व हरणबारी प्रकल्पामध्ये गाळाचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणावर असल्याने या धरणांची पाणी साठवण क्षमता ही कमी झाली आहे. म्हणुन हे धरणे लवकर भरत असल्याच्या प्रतिक्रिया ही या भागातील जनतेकडून दिल्या जात असल्या तरी धरणातील वाढलेला पाणी साठा उन्हाळ्यातील दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी कामी येणार आहे, तर पावसाळ्याला अजून दोन महिने आवधी आहे. या कालावधीत सरासरी पेक्ष्या जास्त पावसाळा झाल्यास रब्बी हंगामाला पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येणार नाही. आगामी काळात पावसाळा कसा असेल यावरच दुष्काळाची चाहूल समजणार असली तरी बागलाण मधील दोघे ही मुख्य धरणे भरल्याने तूर्तास तरी बागलाण कर जनतेला दिलासा मिळाला आहे.