मुंबई/एनजीएन नेटवर्क
आजवर अत्यंत समंजसपणे, शांतपणे आपल्या भावना व्यक्त केलेल्या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की, त्यांनी संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये. आंदोलनाच्या आगीवर स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजू पाहणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मला समाजाच्या वेदना आणि व्यथांची जाणीव असल्यामुळे आरक्षण मिळवून दिल्यावाचून मी स्वस्त बसणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
जालना येथे शुक्रवारी झालेल्या लाठीमार प्रकरणावर शिंदे यांनी सविस्तर निवेदन केले. ते म्हणाले, जालना जिल्ह्यातील आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी मी संवाद साधला होता. त्यांच्या मागण्यांबाबत माझ्या अध्यक्षतेखाली बैठकाही झाल्या होत्या. त्यांच्या मागण्यांवर शासनाकडून कार्यवाही सुरु होती. पण त्यानंतरही आंदोलन सुरू झाले. मी जरांगे पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, त्या दरम्यान आंदोलकांची प्रकृती खालावली. त्यांच्या जीवाची काळजी होती म्हणूनच जिल्हाधिकारी आणि एसपी तिथे गेले. जरंगे पाटील यांनी रुग्णालयात दाखल व्हावे अशी विनंती त्यांना केली जात होती. मात्र, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरू
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयात आहे. न्यायालयात राज्य शासन पूर्ण तयारीने हा खटला लढत आहे. त्यासाठी नामवंत वकील आणि घटनातज्ज्ञांची फौज शासनाने उभी केली आहे. हा मुद्दा घटनात्मक असल्यामुळे काही अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती गठीत केलेली आहे. आरक्षण मिळवण्यासाठी ज्येष्ठ आणि तज्ज्ञ वकीलांचा टास्क फोर्स स्थापन करून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कायदेशीर उपाययोजना करण्याची प्रक्रियाही सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.