इतिहासात असे काही क्षण येतात जे फक्त युद्धाच्या रणभूमीवरच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राच्या स्मरणात कायमचे कोरले जातात. अशाच एका थरारक, रोमांचक आणि असामान्य शौर्यगाथेने भरलेल्या पर्वाचं नाव आहे “कारगिल युद्ध”. हे केवळ शस्त्रांनी लढलेलं युद्ध नव्हतं, तर ती होती एक महायात्रा – शौर्याची, त्यागाची, प्रेरणेची आणि मातृभूमीवरील निस्सीम प्रेमाची.१९९९ सालच्या त्या दोन महिन्यांहून अधिक काळ भारताच्या उत्तरेकडील हिमालयीन पर्वतरांगांमध्ये जे काही घडलं, ते केवळ सीमांचं रक्षण नव्हतं तर ती होती देशाच्या अस्मितेची लढाई. हाडे गोठवणाऱ्या थंडीमध्ये, प्रचंड उंचीवर, विरळ हवामानात आणि अशक्य वाटणाऱ्या भूप्रदेशात भारतीय सैनिकांनी दिलेला लढा हा केवळ रणांगणातील पराक्रम नव्हे, तर हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर कोरलेली देशभक्तीची ओळ आहे……श्री. योगेश अशोक चकोर, शिक्षक तथा एन सी सी अधिकारी,भोंसला मिलिटरी स्कूल (८१४९८८९७४३)
दोन महिने, तीन आठवडे आणि दोन दिवस जगातल्या सर्वांत उंचीवरच्या भूमीत कारगिलचे युद्ध लढले गेले. ३ मे ते २६ जुलै हा तो कालावधी. या युद्धातल्या प्रत्येक दिवसाच्या स्मृती लष्करातर्फे जागविल्या जात आहेत. युद्धभूमी ते आजचे कारगिल यात भरपूर फरक आहे.देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच तुमचा शत्रू तुमच्या डोक्यावर चढून वार करत होता, टायगर हिलवरच्या आपल्या चौक्या ताब्यात घेऊन पाकिस्तानने छुपा वार केला होता, गुराख्यांनी तिथे आपले लष्कर नसल्याची बातमी आणली… तोवर कारगिल-श्रीनगर रस्त्यावरून जाणाऱ्या लष्कराच्या गाड्यांना रॉकेट लाँचवर टार्गेट केले होते… शत्रू नेमका कुठे आहे ते कळत नव्हते.
१९४७, १९६५ आणि १९७१ या लढायांमध्ये काश्मीरला भारतापासून तोडण्याचे निष्फळ प्रयत्न पाकिस्तानने केले होते. भारताने पाकिस्तानचा सियाचीन हिमनद्यांचा ताबा घेण्याचा प्रयत्न भारताने निष्फळ केला होता मात्र पाकिस्तानने हा ताबा घेतला असता, तर काराकोरम खिंडीपर्यंतचा भूभाग पाकिस्तानच्या आधिपत्याखाली आला असता. सियाचीन हिमनद्यांचा भूभाग वेगळा पाडून गिळंकृत करण्यासाठी या भूभागाच्या दक्षिणेकडील प्रदेशावर ताबा मिळवणे आणि द्रास-लेह सारख्या रस्त्यांवर स्वतःचा प्रभाव पाडून भारताच्या सामरिक हालचाली खंडित करणे, हे तंत्र सामरिक दृष्ट्या पाकिस्तानच्या फायद्याचे ठरणार होते.
कुरापत काढण्यासाठीच कारगिलची निवड
ऑक्टोबर १९९८ मध्ये दोन वरिष्ठांना डावलून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी जनरल परवेझ मुशर्रफ यांना सरसेनापतिपद बहाल केले होते. मुशर्रफ आणि आयएसआय (पाकिस्तानी गुप्तहेर संघटना) या दोहोंच्या दृष्टीने काश्मीर प्रश्न प्रज्वलित राहणे आवश्यक होते. काश्मीर खोऱ्यातील आयएसआयच्या कारवायांना भारतीय सुरक्षा दलांनी लगाम घातल्याने एका नवीन भागात कुरापत काढण्यासाठी पाकिस्तानकडून कारगिलची निवड करण्यात आली होती. कारगिल भागात घुसखोरी केल्याने पाकिस्तानचे दोन उद्देश साध्य होणार होते.ऑक्टोबर १९९८ ते मार्च १९९९ या कालावधीत पाकिस्तानकडून घुसखोरीची सर्व तयारी करण्यात आली त्यात सीमारेषेपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती केली, खेचरांसाठी पायवाटा बनविण्यात आल्या. विविध अत्याधुनिक बंकर्स उभे करून त्यांच्यात जड शस्त्रास्त्रे, दारूगोळा, खाण्यापिण्याचे पदार्थ, बर्फातील बूट इत्यादींचा साठा करण्यात आला. दूरध्वनी यंत्रणा विकसित करण्यात आली. ताबारेषेच्या अगदी जवळच सुमारे ८ ते १० हेलिपॅड बनविण्यात आले.
रेकी अन् तोंड देण्याची सक्षम तयारी
पाकिस्तानकडून १९९९च्या जानेवारी आणि फेब्रुवारीच्या सुरवातीला प्रथम निरीक्षण पथके (रेकी पार्टी) पाठविण्यात आली. त्यानंतर मार्चमध्ये पाकिस्तान नॉर्थ लाइट इन्फन्ट्रीच्या पलटणीच्या तुकड्यांनी मार्च केले. रसद, दारूगोळा आणि हत्यारे पुढे आणली गेली. विविध डोंगरमाथ्यांची आणि पठारांची निवड करून त्यांवर बंकर्स उभारण्यात आली. त्यात ५० – ५५ पाकिस्तानी सैनिकांच्या तुकड्या राखीव करण्यात आल्या. मशीनगन, रॉकेट लाँचर, स्वयंचलित ग्रेनेड लाँचर, मोर्टर, विमानविरोधी तोफा आणि विमानांवर अचूक मारा करणारी अत्याधुनिक प्रक्षेपणास्त्रे ठेवण्यात आली. भूसुरुंग पेरण्यात आले. १९९८-९९चा हिवाळा सौम्य असल्यामुळे हे काम सुकर झाले. काश्मीर स्वतंत्र करण्याच्या प्रेरणेने पेटलेल्या काश्मिरी स्वातंत्र्यसैनिकांची ही कामगिरी आहे, असे भासविण्यासाठी नॉर्थ लाइट इन्फन्ट्रीच्या सैनिकांना सलवार-कमीजचा पेहराव दिला गेला. वास्तविक जीनिव्हा कराराचा आणि सैनिकीमूल्यांचा हे उल्लंघन होते.
१९९८-९९च्या सौम्य हिवाळ्यामुळे एका बाजूस पाकिस्तानची घुसखोरी सुकर झाली, तर दुसऱ्या बाजूस नैसर्गिक बदलानुसार जूनमध्ये बर्फ वितळण्यास सुरू होण्याऐवजी मे १९९९ मध्येच वितळल्यामुळे त्याची वाट पाहत असलेल्या येथील मेंढपाळांना काकसर आणि बटालिक यांमधील डोंगरदर्यांत पाकिस्तानी सैनिक मोर्चे बांधत असलेले दिसले. ४ मे रोजी मेंढपाळांकडून ही बातमी भारतीय सैन्याला मिळाल्यावर चक्रे वेगाने फिरू लागली
ते दोन पर्याय आणि भारताची सामर्थ्य शक्ती
पाकिस्तानी मोर्चे मोक्याच्या जागांवर उभारलेले होते आणि ते सभोवतालच्या प्रदेशावर निरीक्षण आणि प्रभुत्वाने परिपूर्ण होते. उभे सरळ डोंगरी कडा, दुर्गम पाऊलवाटा, सात-आठ हजार फूट शत्रूच्या नजरेखाली चढून जाताना होणारी दमछाक, अंगावर जड कपडे, पाठीवर शस्त्र, दारूगोळा आणि खाण्याच्या सामानाचे अवजड वजन हे सगळे पेलत दुर्गम पर्वतराजींच्या शिखरांवर ठाण मांडून बसलेल्या पाकिस्तानी सैन्यांवर हल्ला चढविणे व सुसज्ज घुसखोरांना ताबारेषेमागे हाकलणे ही कठीण व खडतर कामगिरी होती आणि त्यासाठी अमाप इच्छाशक्ती आवश्यक होती. भारतासमोर मुख्यत: दोन पर्याय होते. पहिला, ताबारेषा न ओलांडता घुसखोरांना मागे रेटणे आणि दुसरा, काश्मीरमध्ये वा इतरत्र आक्रमणाकरवी पाकिस्तानी प्रदेश काबीज करून कारगिलमधील घुसखोरी मागे घेण्यास पाकिस्तानला भाग पाडणे. भारताने १९७१ नंतर सिमला कराराचे काटेकोरपणे पालन केले होते. भारताने आता ताबारेषा ओलांडणे म्हणजे पाकिस्तानी खोडसाळपणाचे समर्थन करण्याजोगे होते
उंचच उंच भाग अन् चढाईचे आव्हान
पाकिस्तानी मोर्चाबंदीचे प्रामुख्याने दोन विभाग होते. पहिला द्रास-मश्को विभाग आणि दुसरा बटालिक विभाग. द्रास विभागात पाकिस्तानने टोलोलिंग, पॉइंट ४७००, पॉइंट ५१४०, पॉइंट ४५९०, टायगर हिल वगैरे वेगवेगळ्या डोंगरसरींवर आपली ठाणी उभारली होती (पॉइंट ५१४० म्हणजे ५१४० मीटर उंचीचा डोंगरमाथा). बटालिक विभागात जुब्बार आणि खालुबार डोंगरसऱ्यांवरील वेगवेगळ्या उंचवट्यांवर त्यांनी ठाणी उभारली होती. द्रास विभागात सर्वांत प्रथम टोलोलिंगच्या मोर्चावर हल्ले चढविण्यात आले. १५०० फूट उंचीच्या या बलवत्तर आणि भक्कम ठाण्यावरून शत्रू महामार्गावर परिणामकारक गोळीबार करू शकत होता. हे ठाणे सर्वांत प्रथम काबीज करणे आवश्यक होते. हे काम १८ ग्रिनेडिअर्स या पलटणीला देण्यात आले. २२ मे रोजी चढाई सुरू झाली; परंतु टोलोलिंग माथ्याच्या वाटेतील या पॉइंट ४५९०वरून त्यांच्यावर शत्रूचा अचूक गोळीबार होऊ लागला आणि पुढे जाणे अशक्य होऊन बसले. त्यानंतर अनेक हल्ले अयशस्वी झाले. विशेषेकरून शत्रूचा एक बंकर (बरबाद बंकर) कमालीच्या मोक्याच्या स्थानावर होता. तब्बल वीस दिवस शत्रूने भारतीय तुकड्यांना पुढे येऊ दिले नाही. ११-१२ जून रोजी बोफोर्स तोफा उघड्यावर आणून त्यांतून बरबाद बंकरवर थेट मारा करण्यात आला. हे एक निर्णायक वळण होते. नेम धरून येणारा गोळीबार खंडित झाल्यावर २ राजपुताना रायफल्स, जम्मू काश्मीर रायफल्स आणि १८ गढवाल या तीन पलटणींनी तीन वेगवेगळ्या दिशांनी पॉइंट ५१४०वर एकाच वेळी हल्ला चढवून ते सर केले. त्यात कॅप्टन विक्रम बत्रा यांनी दाखविलेला पराक्रम व नेतृत्वासाठी त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.
गोरखा रायफल्सची उत्कृष्ठ कामगिरी
भारतीय लष्कराच्या चढाई करणाऱ्या तुकड्यांवर डोंगराच्याकडे-कपारीतून अचूक गोळाफेक करणाऱ्या पाकिस्तानी मोर्चाचे बळ क्षीण करण्याचा आणि त्यांच्यावर परिणामकारक भडिमार करण्याचा एक मार्ग होता. त्यानंतर मिग‒२१ बिझ, मिग‒२३ बी एन, मिग‒२७ एम, मिग‒२९ बी आणि शेवटी मिराज–२००० या लढाऊ विमानांनी, तसेच एमआय‒१७ हेलिकॉप्टर्सनी जवळजवळ ३४०० उड्डाणे करून पाकिस्तानी घुसखोरांच्या नाकीनऊ आणले. यात भारताने दोन मिग‒२७ आणि एक एमआय‒१७ हेलिकॉप्टर गमावले. मर्यादित युद्धात वायुसेनेचा नियंत्रित स्वरूपात उपयोग हा एक अभूतपूर्व आणि अनोखा प्रयोग होता. ४ जुलैला टायगर हिलचा बालेकिल्ला पडल्यावर शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांच्याकडे धाव घेतली. वॉशिंग्टनमध्ये चर्चेपश्चात आपल्या सैन्याला कोणत्याही अटीशिवाय ताबारेषेच्या मागे घेण्याचे त्यांनी कबूल केले. कारगिलमधील ‘टायगर हिल’, ‘तोलोलिंग’, ‘पॉइंट ५१४०’ या डोंगरशिखरांवर केवळ शत्रू नव्हे, तर अवघड भूगोल, निसर्ग, आणि परिस्थिती यांच्याशीही लढत भारतीय जवानांनी शौर्याच्या नव्या व्याख्या निर्माण केल्या. या युद्धाने भारताला केवळ सैनिकी विजय मिळवून दिला नाही, तर संपूर्ण राष्ट्राला एक अभिमानाची, अस्मितेची आणि आत्मविश्वासाची ओळख दिली. ह्या विजयामागे असलेले लढवय्ये, त्यांचे पराक्रम आणि त्याग आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहेत.
कारगिल विजय हा एक सैनिकी संघर्ष नसून, जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचं अमर तेज आहे.
कारगिल विजय म्हणजे केवळ युद्ध नाही, तर धैर्य, समर्पण आणि मातृभूमीवरील प्रेमाचं प्रतीक आहे.
जयहिंद ! वंदे मातरम !
Comments are closed.