नाशिक/एनजीएन नेटवर्क
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालकाकडून ६० हजाराची खंडणी उकळल्या प्रकरणी एका स्थानिक वृत्त वाहिनीच्या पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित एका वृत्त वाहिनीचा पत्रकार असून जिल्हा बँकेचे माजी गणपतराव पाटील यांनी संबंधिताविरोधात तक्रार दिली. पाटील हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक आहेत. संशयिताने पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना वाहिनीच्या कार्यालयात बोलावून घेतले. भोई नावाच्या व्यक्तीने एका बँकेतून घेतलेल्या कर्जाबाबत तक्रार केल्याचे सांगितले. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली जाईल तसेच याबाबतची बातमी पेपरला देणार असल्याचे धमकावले. हे प्रकरण मिटविण्यासाठी ८० हजार रुपयांची मागणी त्याने केली. तडजोडीअंती ६० हजार रुपयांची खंडणी देण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित पत्रकार लचके विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती आहे.