निफाड/एनजीएन नेटवर्क
पोलीस ठाण्यात कामानिमित्त गेलेल्या एका पत्रकाराची शहानिशा न करता नुकताच पदभार स्वीकारलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाने शिवीगाळ केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. ४) रात्रीच्या सुमारास घडला. या घटनेमुळे पोलिसांच्या मनमानीपणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक पत्रकार देविदास बैरागी हे शुक्रवारी रात्री कामानिमित्त गेले होते. त्याचवेळी एका प्रकरणात पोलीस ठाण्यात आलेला व्यक्ती याठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकार बैरागी यांच्याशी बोलत होता. त्याचवेळी नांदगावहून बदली होऊन आलेल्या सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील यांनी कुठलीही शहानिशा न करता बैरागी यांना शिवीगाळ केली. बैरागी यांनी आपली ओळख सांगितल्यानंतरही पाटील यांनी ऐकून घेतले नाही. या संतापजनक प्रकारामुळे ईश्वर पाटील यांच्या अरेरावीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना निफाड पोलिसांकडून ही वागणूक दिली जात असेल तर सामान्य नागरीकांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याबाबत पोलीस निरीक्षक बापू महाजन यांना सांगितले असता त्यांनी “ईश्वर पाटील नवीन आहे” असे सांगत हात वर केले. त्यामुळे निफाड पोलिसांच्या कामकाजावर वरिष्ठांचे लक्ष नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
——————————
शिवीगाळप्रकरणी दोषीवर कारवाई करु
@ निफाड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील यांनी पत्रकाराला केलेल्या शिवीगाळ प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल.
- डॉ निलेश पालवे
उपविभागीय पोलिस अधीक्षक निफाड