पॅरिस/एनजीएन नेटवर्क
टेनिस इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू असा लौकिक मिळवण्याच्या दृष्टीने नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी महत्त्वाचे पाऊल टाकले. जोकोव्हिचने फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रुडवर विजय मिळवताना कारकीर्दीतील विक्रमी २३व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवली. या कामगिरीसह त्याने पुरुषांमध्ये राफेल नदालचा (२२) सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम मोडीत काढला.
तिसऱ्या मानांकित सर्बियाच्या जोकोव्हिचने अंतिम सामन्यात रुडवर ७-६ (७-१), ६-३, ७-५ अशी मात करताना तिसऱ्यांदा फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ‘लाल मातीचा बादशाह’ अशी ओळख असणारा १४ वेळचा फ्रेंच स्पर्धेचा विजेता नदाल यंदा दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत जेतेपदाची सुवर्णसंधी जोकोव्हिचने साधली. त्याने उपांत्य फेरीत अग्रमानांकित कार्लोस अल्कराझला पराभूत केले. मग रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात रुडचा सलग तीन सेटमध्ये पराभव केला.