नाशिक/एनजीएन नेटवर्क
येथील प्रसिद्ध बालसाहित्यिक संजय वाघ यांच्या साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कारप्राप्त ‘जोकर बनला किंगमेकर’ या प्राजक्ता प्रकाशन, नाशिकने प्रकाशित केलेल्या बालकादंबरीचा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
आत्मविश्वास हरवलेल्या मुलांना प्रेरणा देणाऱ्या व सामाजिक बांधिलकीचे संस्कार करणाऱ्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या बालकादंबरीचा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन विद्यापीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सन २०२३-२४ पासून समावेश झाला आहे. त्यामुळे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बालसाहित्याचे स्वरूप व विविधता अभ्यासता येणार आहे. या बालकादंबरीला साहित्यातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमीचा पुरस्कार तसेच राज्यस्तरीय विविध पुरस्कार लाभले आहेत. यापूर्वी संजय वाघ संपादित ‘श्रीपाल सबनीस प्रणीत प्रतिभा संगम’ या पुस्तकाचा जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए. च्या अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून तर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रथम वर्षे कला या वर्गाच्या अभ्यासक्रमात ‘गाव मामाचं हरवलं’ या बाल-किशोर काव्यसंग्रहातील ‘झाडबाबा’ या कवितेचा समावेश झालेला आहे. नाशिक येथील साहित्यिकाच्या साहित्यकृतीचा विद्यापीठ स्तरावरील अभ्यासक्रमात समावेश झाल्याने जिल्हावासियांकडून संजय वाघ यांचे अभिनंदन होत आहे.
——————
@ महाराष्ट्रातील प्राचीन आणि महत्वाच्या विद्यापीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात आपल्या साहित्यकृतीचा समावेश होणे ही एक लेखक म्हणून समाधानाची व अभिमानाची बाब आहे. अभ्यासक्रमाच्या निमित्ताने विद्यापीठ कार्यकक्षेतील विद्यार्थ्यांकडून ही बालकादंबरी अभ्यासली जाईल व सर्वदूर पोहचेल, याचा आनंद आहे.
– संजय वाघ, साहित्यिक, नाशिक