NGN News
Latest Marathi News

लाखलगाव येथे जपानुष्ठान सोहळ्यास उत्साहात प्रारंभ

  • जगदगुरु शांतीगिरिजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती
  • लक्षवेधी पालखी मिरवणुकीने झाला प्रारंभ

नाशिक : अमर आढाव

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र लाखलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ओम जगदगुरु जनशांती धर्म सोहळ्याचा शुभारंभ लक्षवेधी पालखी मिरवणुकीने करण्यात आला.यावेळी “जय बाबाजी” अशा प्रचंड जयघोषात मौनव्रत साधनेस व विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. सोहळ्या दरम्यान जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे रोज भागवत मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे.

निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचा ३६ वा पुण्यस्मरण सोहळा भक्त परिवाराचे राजधानी आश्रम श्रीक्षेत्र वेरूळ येथे पुढील महिन्यात होणार आहे.या सोहळ्याची रंगीत तालीम म्हणून श्रीक्षेत्र लाखलगाव येथे आठवडाभर मौन व्रतात जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यास अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांची उपस्थिती लाभणार असून त्यांचे रोज भागवत मार्गदर्शन देखील लाभणार आहे.

या सोहळ्याचा प्रारंभ लक्षवेधी पालखी मिरवणुकीने करण्यात आला.प्रारंभी जगदगुरु पाद्य पूजन,पालखी पूजन, तसेच संत,अतिथी व ब्राम्हण पूजन संपन्न झाले.श्रीफळ वाढवून साधकांच्या मौन व्रताचा प्रारंभ झाला. येथे आठवडाभर भरगच्च कार्यक्रम संपन्न होणार आहे. जपानुष्ठान, अखंड नंदादीप, महायज्ञ, अभिषेक पूजन, हस्तलिखित नामजप,नामसंकीर्तन, श्रमदान, रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी, दिवसातून चार वेळा विधी-पाठांतर, भागवत वाचन, सत्संग, महाआरती आदी विविध आध्यात्मिक व सामाजिक उपक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रम यशस्वितेसाठी लाखलगांव येथील जय बाबाजी भक्त परिवार उत्साहाने प्रयत्नशील आहे.

Comments are closed.