मुंबई/एनजीएन नेटवर्क
जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने याप्रकरणी महत्त्वाची कारवाई केली आहे. गृहमंत्रालयाने जालना पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. गृहमंत्रालयाने आदेश काढून जालन्याचे पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी जे उपोषण सुरु होते, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्त वाढवल्यानंतर गावकरी आक्रमक झाले होते. त्यावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. या लाठीचार्जमध्ये आंदोलक मोठ्या प्रमाणावर जखमी झाले होते. आता या प्रकरणाचे खापर पोलिसांवर फोडण्यात आलं आहे. त्यामुळे दोष पोलीस अधिक्षकांचा आहे असा समज निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षकांना निलंबित करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता राज्याच्या गृहमंत्रालयाने पोलीस अधिक्षकांवर कारवाई करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे. मात्र अधिक्षकांसह लाठीचार्ज करणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.