जळगाव/एनजीएन नेटवर्क
माझ्या मुलाने स्टेट बँकेच्या विरोधात केसेस केल्या आहेत. त्याने त्या केसेस मागे घ्याव्यात, पण तो त्या केसेस मागे घेत नसल्यामुळे बँक तडजोड करायला तयार नाही. त्यामुळेच या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र जे होईल ते कायद्यानुसार होईल, असे राजमल लखीचंद ज्वेलर्सचे संचालक ईश्वरलाल जैन यांनी म्हटले आहे.
राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली. या कारवाईनंतर जैन हे प्रसार माध्यमांना सामोरे गेले. ते म्हणाले, स्टेट बँक ऑफ इंडिया प्रकरण आहे त्या प्रकरणात स्टेट बँकेने सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून सीबीआयकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे फिर्याद रद्द व्हावी यासाठी आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि त्याच्यावर कामकाज सुद्धा सुरू आहे. अशाच प्रकारच्या एका प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल समोर आला आहे. यात फॉरेन्सिक ऑडिटची कॉपी ही दिली गेली पाहिजे तसेच डिफाल्टर अकाउंट घोषित करण्यापूर्वी संबंधित त्याला संधी दिली पाहिजे, त्या दोन्ही तक्रारदारासोबत झाल्या नाहीत त्यात संबंधितांची फिर्याद रद्द करण्यात आली. त्याच पद्धतीने आमची सुद्धा अशीच केस असून आम्हाला सुद्धा वारंवार मागणी केल्यानंतरही संबंधित तपासणी करून फॉरेन्सिक ऑडिटची कॉपी देण्यात आलेली नाही. तसेच मला कुठलीही संधी सुद्धा दिलेली नाही आणि संबंधित तपासणी थेट घोषित करून टाकली. त्यामुळे हे नियमाला धरून नाही. नियमबाह्य आहे. सीबीआयच्या फिर्यादीनुसार ईडीने तपास करताना जी कारवाई केली आहे ती मला चुकीची वाटते आहे, असे जैन यांनी सांगितले.