कोलकाता/एनजीएन नेटवर्क
मणिपूर हिंसाचारादरम्यान जमावाने दोन महिलांना नग्न करत त्यांची धिंड काढल्याच्या प्रकरणाचे देशभर याचे पडसाद उमटले. ही घटना ताजी असताना आता पश्चिम बंगालमध्येही अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात दोन आदिवासी महिलांना कथितपणे नग्न करून मारहाण करण्यात आली आहे.
या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना १९ जुलै रोजी मालदा जिल्ह्यातील बामनगोला येथील आठवडी बाजारात घडली. मालदा जिल्ह्यातील माणिकचक परिसरातील पाच आदिवासी महिला आपली स्थानिक उत्पादने विकण्यासाठी आठवडी बाजारात आल्या होत्या. यावेळी त्यांना इतर महिलांनी चोरी करताना पकडले. यातील तीन महिला पळून जाण्यात यशस्वी झाल्या पण दोन महिलांना इतर महिलांनी बाजारपेठेत पकडून मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेच्या व्हिडीओ फुटेजमध्ये महिलांचा एक गट दोन महिलांना चपलनं मारहाण करताना आणि त्यांचे कपडे फाडताना दिसत आहे.