मुंबई/एनजीएन नेटवर्क
‘तुमच्या मते राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण,’ असा प्रश्न सर्वेक्षणात ‘सी व्होटर’कडून राज्यातील जनतेला विचारण्यात आला होता. या प्रश्नावर तब्बल ६६ टक्के लोकांना शरद पवार यांच्या बाजूने, तर केवळ २५ टक्के लोकांनी अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला आहे. तसेच ९ टक्के लोक अजूनही संभ्रमात असल्याचे या सर्व्हेतून समोर आले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आमदार आणि पक्षातील पहिल्या फळीतील दिग्गज नेत्यांच्या साथीने पक्ष काबीज करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरीही अजूनही जनता मात्र शरद पवारांच्या बाजूने असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ज्या नेत्यांना पक्षाच्या स्थापनेपासून मोठमोठी पदे दिली, तेच नेते दुरावल्याने शरद पवार हे राजकीय संकटात सापडले आहेत. मात्र तरीही ८३ वर्षीय शरद पवार पुन्हा लढण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत. अशा स्थितीत ते पुन्हा पक्षाला उभारी देऊ शकतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र या प्रश्नावरही जनतेने सकारात्मक कौल दिला असून ५७ टक्के लोकांना शरद पवार हे पुन्हा राष्ट्रवादी जोमाने उभी करण्यात यशस्वी ठरतील, असा विश्वास वाटत असल्याचे सी व्होटरचा सर्व्हे सांगत आहे. तर ३७ टक्के लोकांना ही शक्यता प्रत्यक्षात येईल, असे वाटत नाही. तसेच ६ टक्के लोकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे.
लढाई सोपी नाही
राष्ट्रवादीतील बहुसंख्य आमदारांचे पाठबळ, राज्य पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांची साथ आणि केंद्र व राज्यातील सत्तेची ताकद आता अजित पवार यांच्या पाठीशी आहे. मात्र त्यांचा मुकाबला आहे तो ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय कारकीर्द गाजवणाऱ्या शरद पवार यांच्याशी ही लढाई अजित पवार यांना तितकीशी सोपी असणार नाही, हेच या ताज्या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे.