नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण अजून ताजे असताना संगीता, अंजूनंतर एका महिलेची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. प्रेमासाठी वर्षभराच्या मुलाला घेऊन ही महिला नोएडामध्ये पोहोचली आहे. प्राप्त माहितीनुसार या महिलेचे नाव सानिया अख्तर असून ती बांगलादेशहून आली आहे.
नोएडामधील सौरभ तिवारीने बांगलादेशमध्ये तिच्याशी लग्न केल्याचा दावा या महिलेने केला आहे. सौरभ कांत तिवारी जेव्हा नोकरीसाठी बांगलादेशमध्ये आला होता तेव्हा त्यांचे प्रेम झाले. त्यानंतर त्यांनी मुस्लिम पद्धतीने लग्न केले. आज त्यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली असून त्यांना एक वर्षांचा मुलगा आहे. सानियाच्या दाव्यानुसार, लग्नानंतर ती प्रेग्नेंट राहिल्यानंतर सौरभने भारतात जाण्याचा निर्णय घेतला. भारतात काही महत्त्वाचे काम संपवून परत येतो असे सांगून तो गेला पण अनेक महिने झाले तरी तो परत आला नाही. सौरभला फोन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांने सर्व नंबर बंद केले होते.
.. सानियावर आभाळ कोसळले
सानिया व्हिसा घेऊन भारतात आली खरी पण सौरभच्या घरात गेल्यावर तिच्यावर आभाळ कोसळले. सौरभच्या घरी गेल्यावर तिला कळले की त्याने दुसरे लग्न केले आहे. तर आता तो तिला स्विकारण्यास नकार देत असल्याचा तिने आरोप केला आहे. त्यानंतर सानिया मुलासह सेक्टर 108 मधील पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचली आणि तिने त्यांना मदतीची याचना केली आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार सौरभ बंगालादेशमधील ढाकामध्ये कल्टी मॅक्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करत होता. सानिया आणि तिच्या मुलाला पोलिसांनी सेक्टर-62 मधील डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवले आहे. दरम्यान नोएडा पोलीस आयुक्तालयाच्या महिला कक्षाने सौरभ आणि तिच्यामध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला.