बंगळुरू/एनजीएन नेटवर्क
बंगळुरूमध्ये विरोधी पक्षाच्या दोन दिवसांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 26 पक्ष या बैठकीमध्ये सहभागी झाले. या बैठकीत आघाडीच्या नावाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीचे नाव INDIA ठेवले आहे. या नावाचा फूलफॉर्म (Indian National Democratic Inclusive Alliance)असल्याचं सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीचं हे नाव टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी कालच्या बैठकीत सुचवलं होतं, ज्यावर बहुतेक विरोधकांनी सहमती दर्शवली.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या नावाबाबत अजूनही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, पण बहुतेक पक्षांनी या नावाचं समर्थन केलं आहे. भारतामध्ये पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी भाजपच्याविरुद्ध सगळे विरोधक एकत्र यायचा प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून बंगळुरूमध्ये 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली. याआधी जून महिन्यात बिहारच्या पाटण्यामध्ये विरोधकांची बैठक झाली होती. विरोधकांनी एकत्र निवडणूक लढून मतांचं विभाजन टाळण्यासाठी आणि भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत.