मालेगाव/एनजीएन नेटवर्क
महात्मा गांधी विद्यामंदीर आणि आदिवासी सेवा समिती या दोन संस्था विशिष्ट कुटुंबाने ताब्यात घेतल्या असून त्या राजकीय अड्डा बनवल्या गेल्याचा घणाघाती आरोप पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे रविवारी केला. या संस्थांचा कारभार लोकशाही मार्गाने सुरु केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिज्ञाही भुसे यांनी केली. भुसे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे भविष्यात मालेगावमध्ये भुसे विरुद्ध हिरे ‘सामना’ रंगण्याचे चिन्हे गडद झाली आहेत.
शिवसेना पक्षाचा रविवारी मेळावा पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भुसे यांनी जोरदार टोलेबाजी केली. भुसे म्हणाले, महात्मा गांधी विद्यामंदीर आणि आदिवासी सेवा समिती या संस्था उभारताना तालुक्यातील अनेक कुटुंबांचे योगदान असले तरी त्यांना बाजूला सारून विशिष्ट कुटूंबाने त्यांवर कब्जा केला आहे. येथील कर्मचाऱ्यांना खासगी कामासाठी राबविले जाते तर शिक्षकांना राजकीय कामासाठी जुंपले जाते. त्यामुळे या संस्थांचा शैक्षणिक दर्जा खालावून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आगामी काळात या संस्थांवर तालुक्यातील प्रत्येक कुटूंबाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार असल्याचे भुसे यांनी नमूद केले.
संजय राऊत यांना आव्हान
दरम्यान, गिरणा सहकारी साखर कारखाना खरेदीच्या नावाने १७८ कोटीचा शेअर्स घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याबद्दल राऊत यांचा नामोल्ल्लेख टाळत, आरोप करणाऱ्यांनी ते सिध्द करुन दाखवावेच, असे आव्हान भुसे यांनी यावेळी दिले. येत्या १६ सप्टेंबर रोजी कारखाना खरेदी करण्यासाठी शेअर्स घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची मालेगावात बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत जमा झालेल्या शेअर्स रकमेसंदर्भात आढावा घेण्यात येणार आहे, अशी माहितीही भुसे यांनी दिली.