** एनजीएन नेटवर्क
एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवताना मूळ शिवसेनेला लावलेला सुरुंग ‘मातोश्री’ साठी जितका अनपेक्षित होता, तितकाच तो धक्कादायक राहिला. अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढलेल्या या बंडाने शिंदे यांनी केवळ उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पदच्युत करण्याचा करिष्माच नाही केला, तर त्यांच्या जागी बसण्याची स्वप्नपूर्तीही साधली. शिंदे यांचे राज्याच्या शीर्षस्थानी जावून पोहचणे आणि पाठोपाठ संघटनात्मक अंगाने धक्क्यावर धक्के देण्याची प्रक्रिया अव्याहत ठेवणे, ही बाब उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या बिनीच्या मावळ्यांना कमालीची जिव्हारी लागलीय. पक्षाची वाताहत थांबता थांबत नसल्याने उद्धव यांच्यासह त्यांच्या पक्षाचे नेते शिंदे आणि त्यांना सावलीसारखी साथ देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर अक्षरशः तुटून पडताना दिसताहेत. शिंदे यांच्या जाण्याने आपल्या पक्षाची अपरिमित हानी झाली आहे, हे वास्तव स्वीकारायला ठाकरेंची मानसिकता आजही तयार नाही. आदित्य ठाकरे यांच्या आताच्या नाशिक दौऱ्यात नेमकी हीच बाब अधोरेखित झाली आहे. शिंदे आणि त्यांच्या सवंगड्यांवर कठोर शब्द्प्रहार करून निवडणुकीत त्यांना नेस्तनाबूत करण्याचा आदित्य यांचा निर्धार अपेक्षित असला तरी ते सत्य प्रत्यक्षात उतरवायचे तर त्यासाठी स्वपक्षाचे मजबूत संघटन लागेल. दुसरे म्हणजे मतदारांनी त्यांच्या परिमाणात गद्दारांना का नाकारावे, हे सोदाहरण पटवून देण्याची हातोटी आत्मसात करावी लागेल. केवळ शिंदेंना गद्दार, घटनाबाह्य मुखिया, खोकेवाला म्हणून हिणवण्यातून जनता त्यांना नाकारेल का, यावर ‘उबाठा’ पक्षाने खरे तर मंथन करायला हवे.
आपल्या नाशिक दौऱ्यात ‘उबाठा’ पक्षाचे भवितव्य असलेल्या आदित्य ठाकरे यांनी शिंदेंसह त्यांच्या सवंगड्यांना निवडणुकीत सपशेल धूळ चारण्याची आण खाल्ली. स्वतःच्या वयाचा उल्लेख करीत आपण दगा दिलेल्या सगळ्यांना नडणार, असा गर्भित इशाराही आदित्य यांनी दिला. खासदार-आमदार-नेते सोडून गेलेत तरी जनता उद्धव यांच्यासोबत असल्याचा त्यांचा ठाम दावा राहिला. पक्षाच्या मेळाव्यात टाळ्यांचा कडकडाट ऐकणे कोणत्याही राजकीय नेत्याला हायसे वाटणारे असते. मात्र वस्तुस्थितीवर पडदा टाकून सोडलेले वाग्बाण कधीकधी स्वकीयांना आचंबित करत नसल्यास नवलच. जनता उद्धव यांच्या सोबत आहे की नाही, हे चाचपायला निवडणुकीची वाट पहावी लागणार आहे. तथापि, आपल्या दौऱ्यात आजूबाजूला असणारे किती जण खरेखुरे निष्ठावान आहेत, याचेच आधी ‘मार्केट इंटेलिजन्स’द्वारे आदित्य यांनी मूल्यमापन करायला हवे होते. कारण ‘शिवबंधन’ बांधणारे, स्वतःला निष्ठेची विशेषणे लावणारे कित्येक शागीर्द ‘शिंदेशाही’चे पाईक बनलेत. आज सोबत असलेले उद्याच्या राजकारणात कुठे असतील याचीही शाश्वती नाही. बरं, उपस्थित अर्धेअधिक इकडे-तिकडे फेरफटका मारून पुन्हा तंबूत परतले आहेत, याची दखल आदित्य यांनी घ्यायला हवी. पक्षाला सुगीचे दिनू आणायचे तर केवळ शिंदेंना लक्ष्य करून चालणार नाही. भावनिक राजकारणाची गोळी दिली की निष्ठावान तंदुरुस्त बनून शत्रूचा पाडाव करतात, हा राजकीय अंगाने आता इतिहास झालाय. शिंदे एव्हढा मोठा लवाजमा घेवून बाहेर पडण्यामागील नेमकी कारणे काय? त्यांच्यासह बाहेर गेलेल्यांनी केलेल्या आरोपांत तथ्य किती ? बाळासाहेबांना दैवत मानणाऱ्यांना उद्धव यांचे नेतृत्व त्याज्य का ? आरोप करणाऱ्यांच्या भावना नेतृत्वाकडून खरोखर अव्हेरल्या गेल्यात का? या सर्व प्रश्नांवर शांतपणे खल केल्यास अपेक्षित वास्तव समोर येवू शकते.
शिवसेना पक्ष म्हणून एकसंघ असताना राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीचा महत्वपूर्ण भागीदार होती. दस्तुरखुद्द पक्षप्रमुखच मुख्यमंत्रीपदी विराजमान होते. मात्र, तरीही अनेक निवडणुकांत हा पक्ष कधी चौथ्या तर कधी पाचव्या स्थानावर फेकला गेला. नावाला आघाडी शासन असले तरी सगळा कारभार शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच हाकायचा, ही वस्तुस्थिती होती. हीच तत्कालीन पार्श्वभूमी आता बाहेर पडलेल्या शिलेदारांना अस्वस्थ करीत होती. सरकारमध्ये सहभाग आणि पक्षाचा मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला ‘पोलिटिकल मायलेज’ मिळवता आले नाही. आता तर मोजके खासदार-आमदार आणि पदाधिकारी शिल्लक राहिलेल्या या पक्षाचा जनाधार कायम असल्याचा दावा आदित्य ठाकरे कोणत्या मुद्द्यांवर करतात, हा संशोधनाचा विषय ठरावा. नेतृत्वाच्या आप-परभाव वृत्तीला, दोलायमान धोरणांना कंटाळून राष्ट्रवादी कॉंग्रेसची देखील शकले उडाली. कुटुंबातील व्यक्तीनेच शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत भाजप सोबत सलगी केली. मात्र, या भूकंपाने विचलित न होता, आपल्यांना जाहीर दूषणे देत न बसता ८३ वर्षांचा योद्धा अवघा महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज होतो, यापलीकडे वेगळे धैर्य असूच शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक आदर्श वस्तुपाठ आहे. शरीर थकलेले असताना आपण पक्ष पुनर्बांधणी करू शकतो, हा पवारांचा दुर्दम्य आत्मविश्वास खचलेल्या सोबतींना आपसूक नवी उर्जा देणारा ठरावा.
सारांशात, कोणी बाहेर पडल्याने आम्हाला फरक पडत नसल्याचे वारंवार सांगणाऱ्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींचा प्रत्यक्षात एकही दिवस ‘त्यांच्या’ उद्धाराविना जात नाही. याचा अर्थ बाहेर पडलेल्या मंडळींच्या जाण्याने निर्मिलेली जखम आजही भळभळत्या रक्ताने वाहत आहे, याची अप्रत्यक्ष कबुली दिली जात आहे. छगन भुजबळ, गणेश नाईक यांच्यासारखे डझन-दीड डझन दिग्गज शिवसेनेतून बाहेर पडूनही भाजपच्या साथीने महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याची किमया बाळासाहेब ठाकरे यांनी साधली होती. तो कित्ता गिरवून उद्धव यांनी पक्षाला रचनात्मक कार्याद्वारे राखेतून पुनर्जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे केले तर उभा महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेतल्याविना राहणार नाही. अर्थात, त्यासाठी उद्धव यांना बाळासाहेबांचा त्याग आणि शरद पवार यांची संयमी वृत्ती एकत्रित अंगीकारण्याची अपरिहार्यता स्वीकारावी लागेल, एव्हढेच !