२०१४ पर्यंत उच्चभ्रूंचा पक्ष म्हणून प्रतिमा असलेल्या भाजपने खरोखर कात टाकलीय. देशात जे घडतेय त्याचे मराठी मुलखातही प्रत्यंतर येताना दिसतेय. कारण हा पक्ष आता अठरा पगड जातींना आपलासा वाटू लागलाय. त्यांना कवेत घेत सत्तेचा सोपान गाठणे कधीही सोपे, याची प्रमेये साध्य करण्यासाठी भाजप नेतृत्व प्रयत्नशील नसणे म्हणणे शुध्द वेडेपणा ठरेल. देश तीनदा जिंकला, महाराष्ट्रात इतर दोन सवंगड्यासोबत पाशवी बहुमत मिळवत विरोधक धारातीर्थी पाडले. आता भाजपला महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांवर कब्जा करायचा आहे. नाशकातही त्यांचे ठोक समीकरण आहे. म्हणूनच पक्ष महापालिकेसाठी केवळ ‘शंभर प्लस’चा नारा देवून थांबला नाही, तर ही सर्वस्वी जबाबदारी देवेंद्र फडणविसांचे ‘ब्लू आईड बॉय’ गिरीश महाजन यांच्याकडे देवून मोकळा झाला. याच महाजन यांनी रविवारी नाशिक मुक्कामी पक्ष आता ‘हाऊसफुल’ झाल्याचे जाहीर केले. पण महाजन यांचे हे वक्तव्य पोटापासून, ओठापासून की अतिआत्मविश्वासपूर्वक आहे, याची दस्तुरखुद्द भाजपेयींना शंका आली असल्यास नवल नाही.
उद्धव ठाकरेंच्या ऐन वाढदिवशी त्यांच्या पक्षाचे उपनेते सुनील बागुल सवंगड्यांसह कमळावर स्वार झाले. त्यांच्या प्रवेशाने पक्ष आता महापालिकेत जागांची शंभरी गाठू शकेल, अशा कानगोष्टी बहुधा महाजन यांना स्थानिकांकरवी ऐकवल्या गेल्या असाव्यात. म्हणूनच महाजन यांनी उपरोल्लिखित वक्तव्य करण्याचे धारिष्ट्य केले असावे. एकीकडे मोठ्या चेहऱ्यांना पक्षात घेताना विरोधकांना गलितगात्र करण्याची आणि प्रस्थापितांना चुचकारण्याची भाजपची खेळी यामधून अधोरेखित होते. ‘शंभर प्लस’ची दिवसाढवळ्या स्वप्ने रंगवणाऱ्या भाजपला राज्यस्तरावर रामदास आठवलेंच्या ‘रिपाई’ आणि आनंदराज आंबेडकरांच्या ‘रिपब्लिकन सेने’सह चार इतर भावंडे महायुतीत असल्याचा सर्रास विसर पडतोय. बहुधा नाशिकरोडला बबन घोलप, नवीन नाशकात सुधाकर बडगुजर आणि पंचवटीत सुनील बागुल-गणेश गीते जोडगोळी सोबत आल्याने पक्षाचा आत्मविश्वास वर्धिष्णू झालेला दिसतो. या मंडळीना स्थानिक तीन आमदारांची जोड लाभून महापालिकेत ‘इप्सितप्राप्ती’ होईल, असे आडाखे महाजन आणि मंडळीनी बांधले असावेत. सत्तेत असताना काहीही सहजसाध्य होवू शकते, हे समीकरण त्या अडाख्यांना बळ देत असावे.
अर्थात, या सगळ्या राजकीय सारीपाटावर नेतेमंडळी नव्हे तर मतदार निर्णायकी भूमिकेत असतात. अनेकांना डोक्यावर घेणारा हा घटक त्यांनाच ‘निर्नायकी’ बनवून जागा दाखवायला कमी करत नाही. २०१२ मध्ये राज ठाकरेंच्या ‘मनसे’ला सत्तापदावर बसवलेल्या नाशिककरांचा त्यानंतर पाचच वर्षांनी झालेल्या महापालिका निवडणुकीत ‘मूड’ कसा बदलला, याचे विस्मरण बहुधा भाजप नेतृत्वाला पडले असावे. राज्याची सूत्रे हाती असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्या निवडणुकीत नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा निर्णायक ठरली. मात्र, पालकत्व निभावताना त्यांनी नाशिककरांच्या पदरात पुरेसे दान टाकले का, हा संशोधनाचा मुद्दा ठरावा. मग ‘मनसे’ला त्या पक्षाची जागा दाखवणारा नाशिककर आपल्याला तोच न्याय देणार नाही, याबद्दल स्थानिक भाजप नेतृत्व निश्चिंत असेल, तर तो त्यांच्या ‘इंटेलिजन्स’चा भाग असू शकतो. नेतेमंडळी आली म्हणजे जनता सोबत येते, हे दिवस आता राहिलेले नाहीत. अलीकडील लोकसभा निवडणूकीत सत्तेतील महायुतीला मतदारांनी कसे नाकीनाऊ आणले, त्याला पुरते दोन वर्षेही झालेली नाहीत. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी निर्णायकी भूमिका निभावून महायुतीला सत्तेत बसवले असले तरी त्यानंतर सत्ताधाऱ्यांची लोकप्रियता ओसरत असल्याचे व्यापक सूर सांगतात.
असो. नाशिकपुरते बोलायचे तर इथली जनता कोणालाही बांधील नाही, हे १९९२ पासून २०१७ पर्यंतच्या पालिका निवडणूक निकालांवर दृष्टीक्षेप टाकल्यास लक्षात येते. राजकारणात आपल्याला विरोधकच राहिले नाहीत, या भ्रमात भाजपनेही राहू नये. आज पक्षात प्रवेशासाठी लागलेली ‘रीघ’ सहेतुक नाही, हे महाजन यांच्यासह स्थानिक नेतृत्व छातीठोकपणे सांगू शकणार नाही. प्रवेश घेणाऱ्या किंवा त्यांच्या ‘डाव्या-उजव्यां’ना महापालिका निवडणुकीत तिकीट नाकारले गेले तर ते इतर पक्षाच्या पालखीचे भोई झालेत तर आश्चर्य वाटणार नाही. तात्पर्य, भाजप ‘हाऊसफुल’ झालाय, हे गिरीश महाजन यांचे वक्तव्य कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारे आहे की त्यांचा स्वतःचा अतिआत्मविश्वास दर्शक आहे, हे येणारा काळ ठरवणार आहे.
Comments are closed.