NGN News
Latest Marathi News

गुन्हेविश्वात अल्पवयीनांचा सहभाग चिंताजनक; बाल गुन्हेगाराची वयोमर्यादा..

‘मास्टर माइंडस’च्या इप्सितप्राप्तीच्या स्वार्थात करियर लागते पणाला

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

शहरातील विस्फारलेल्या आणि अक्राळविक्राळ रूप धारण केलेल्या गुन्हेगारीचा समूळ नायनाट करण्याचा पोलीस खात्याने चंग बांधला असताना एक धक्कादायक बाब प्रकर्षाने पुढे आली ती म्हणजे अनेक गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा असलेला सहभाग. या श्रेणीतील गुन्हेगारांना कायद्यानुसार तुरुंगात टाकतायेत नाही, बालसुधारगृहात टाकणे अपरिहार्य ठरते. असे असले तरी एव्हढ्या कमी वयात त्यांच्यात धारदार शस्त्रास्त्रे चालवण्याचे आणि एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचे धाडस निर्माण होते कोठून, असा सवाल यानिमित्त उपस्थित होऊ लागला आहे.

गुन्हेगारी कृत्ये करवून घेणारे आर्थिक वा वर्चस्ववाद या कारणांतून भाईगिरी करत असल्याचे कारण संशोधनांती पुढे आले आहे. यासाठी येनकेन प्रकारे मार्ग अवलंबले जातात. अल्पवयीन मुलांचा सहभाग घडवून आणणे, त्यापैकीच एक गंभीर मुद्दा अलीकडे आढळून येतो. एकीकडे आपली इप्सितप्राप्ती करून घेण्यासोबतच केवळ सौम्य शिक्षा होत असल्याचे अशा अल्पवयीन मुलांवर बिंबवण्याचे काम गुन्ह्यातील मास्टर माइंडस करीत असतात. वयाची ही पायरी शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी, वित्तीय गरजा, मानसिक स्थिती, मित्र परिवार या घटकांमुळे प्रभावित होते. मानसशास्त्रज्ञांच्या मते, समाजमाध्यमे आणि शहरी वातावरणामुळे अशी मुले करियरचा विचार न करता नको ती कृत्ये करण्यास धजावतात. बाल गुन्हेगाराची वयोमर्यादा १८ वर्षे असल्याने त्याचा गैरफायदा मास्टर माइंडस उचलतात.

आकडेवारी धक्कादायक..

मध्यंतरी प्रसृत झालेल्या सर्वेक्षणातील आकडेवारी यासंर्भात धक्कादायक मानली जात आहे. त्यानुसार, देशात तब्बल अठरा ते वीस टक्के व्यक्ती नैराश्याचा सामना करीत आहेत. दहा टक्के व्यक्ती भीतीने ग्रस्त आहेत. जगभरात ३५० हून अधिक मानसिक आजार अस्तित्वात आहेत. आजची पिढी याच काही नकारात्मक जगताचा दुर्दैवाने भाग बनली आहे. गुन्हेगारी कृत्यांत खुलेआम सहभाग, आत्महत्या याच मानसिकतेचा भाग असल्याचे मानस शास्त्रज्ञ सांगतात.

नाशकात वेगळा प्रयोग उंबरठ्यावर …

@ नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला समाजातील वाढत्या मानसिक असंतुलनाची दुर्दैवाने जोड लाभली आहे. आधुनिक जीवनशैलीत ताण, दडपण आणि भावनिक ओझे व्यक्त करण्यासाठी सुरक्षित व्यासपीठ मिळत नाही. ही बाब लक्षात घेवून आम्ही काही मानसशास्त्रज्ञ एक अभिनव प्रयोग राबवणार आहोत. या उपक्रमात कोणत्याही व्यक्तीला आपले विचार, भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असेल. उपलब्ध करून दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर कोणाला स्वतःशी संबंधित समस्या सांगता येईल. त्याचे मोफत मार्गदर्शनातून निराकरण करण्यात येईल. शहरातील या क्षेत्रातील काही सहकारीही या उपक्रमात सहभागी होणार आहेत. लवकरच या उपक्रमाला मूर्त स्वरूप लाभेल.

  • डॉ. वृषनीत सौदागर, मानसशास्त्रज्ञ, नाशिक

@ पोलीस ठाण्यांमध्ये जावून जेव्हा बाल गुन्हेगारांचे समुपदेशन करण्यात येते तेव्हा अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळण्यामागे काही समान कारणे आढळतात. मुलांना घरातील नकारात्मक वातावरण जसे की वडील व्यसनाधीन असणे, वडील आईला, घराला सोडून गेलेले असणे अथवा आई किंवा वडील यांचा मृत्यू झालेला असणे या गोष्टी असतात. घरात सातत्याने दारिद्रय, शिक्षण घेणेसाठी आर्थिक पाठबळ नसणे हे मुद्देही यामध्ये महत्वाचे ठरतात. अशा लहान मुलांच्या परिस्थितीचा फायदा सराईत अट्टल गुन्हेगार गुन्ह्यात करवून घेतात.

  • मीनाक्षी जगदाळे, समुपदेशक, हॅपी लाईफ काउनसेलिंग सर्विसेस

Comments are closed.