नाशिक/एनजीएन नेटवर्क
ठराविक कालमर्यादेनंतर जुन्या झालेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी अनेक सोसायटी, अपार्टमेंट्सचे सदस्य इच्छुक असतात. परंतु त्यांना अपुरी माहिती असल्याने दमछाक करावी लागते. इमारतींचा पुनर्विकास या विषयावर सर्वसामान्यांना सखोल माहिती व्हावी, तसेच संपूर्ण प्रक्रिया समजून सांगत, संभाव्य अडचणींवर चर्चा, शंकांचे निरसन करण्यासाठी नुकतीच संस्था पुनर्विकास परीषद अर्थात ‘रिडेव्हलपमेंट कॉनक्लेव्ह’चे आयोजन केले होते.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक सहकारी गृहनिर्माण व अपार्टमेंट्स संस्थांचा महासंघ आणि बी-ऑर्बीट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ही संस्था पुनर्विकास परीषद (रिडेव्हलपमेंट कॉनक्लेव्ह) आयोजित केली होती. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा सभागृह येथे रविवारी (३ सप्टेंबर) ही परीषद उत्साहात पार पडली.
याप्रसंगी सहकारी संस्था, नाशिकचे जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी, तसेच गृहनिर्माण संस्थाचा महासंघ अध्यक्ष ॲड.वसंतराव तोरवणे, नाशिक महानगरपालिकेतील कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, सहाय्यक अभियंता समीर रकटे, पुण्यातील सोसायटी प्लसचे संजय सुर्यवंशी, तसेच बी ऑर्बिट ग्रुपचे संचालक अभिषेक बिरारी, स्ट्रक्चरल ऑडिटर ॲण्ड कन्सल्टींग इंजिनिअर अमित सानप यांनी सहभागी होतांना उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. संस्था पुनर्विकासाचे महत्त्वाचे टप्पे, कागदपत्रांची पूर्तता, कायदेशीर प्रक्रिया यांसह अन्य विविध तांत्रिक बाबी विश्लेषणात्मक व अगदी सोप्या पद्धतीने यावेळी मांडण्यात आल्या. उपस्थितांनीही त्यांना उद्भवणार्या प्रश्न, शंकांचे निरसन उपस्थित तज्ञांकडून करुन घेतले. मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा को-ऑप. हौसिंग सोसायटीज् ॲण्ड अपार्टमेंट्स फेडरेशन लि. नाशिकचे सर्व संचालक व तज्ञ संचालक मंडळ यांचे सहकार्य लाभले.