NGN News
Latest Marathi News

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची कुचंबना; ‘सिमा’ पदाधिकारी आक्रमक

सिन्नर : विकास गीते

रस्ते, गटारीच्या समस्या सुटता सुटत नाहीत. मुलभूत सुविधा देण्याकडे औद्योगिक विकास महामंडळ दुर्लक्ष करत असल्याने माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची कुचंबना होत आहे. कोट्यवधींचा टॅक्स भरुनही मुलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत उद्योजकांनी व्यक्त केली. सिन्नर इंडस्ट्रीयल अँण्ड मँन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (सिमा) कार्यालयात झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांसह उद्योजकांनी अधिकाऱ्यांकडे आपल्या व्यथा मांडल्या.

सिमाचे अध्यक्ष किशोर राठी, उपाध्यक्ष किरण भंडारी, सचिव बबन वाजे, कोषाध्यक्ष राहुल नवले, विश्वस्त रतन पडवळ, अरुण चव्हाणके, शांताराम दारुंटे, श्रीरंग हारदे, सतिश नेहे, संभाजी गडाख, नवनाथ नागरे, नागेश मिश्रा, अजय तांबे, पप्पू उगले, शशिकांत नवले, प्रविण महाजन, अंकुश गिते आदी उपस्थित होते. एमआयडीसीचे उपअभियंता संदीप भोसले, शाखा अभियंता के. एस. माळेकर, अग्नीशमन दलाचे अतुल सोनवणे यांनी उद्योजकांचे प्रश्न जाणून घेतले.

औद्योगिक वसाहतीतील जिंदाल फाटा ते एफडीसी या मुख्य तीन किलोमीटरच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यावर अपघात होत असून त्याची सुधारणा करण्याची मागणी केली. त्यानुसार लगेचच खड्डे दुरुस्ती हाती घेतली असली तरी त्याचा दर्जा चांगला असावा. मुख्य रस्त्यावरील प्रत्येक खड्डा दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. सिमेंट काँक्रीटीकरण प्रस्ताव सादर केला असून हा प्रस्ताव मुंबईच्या वरिष्ठ कार्यालयास तातडीने पाठवावा, अशी मागणी केली.

उपअभियंता भोसले यांनी हा रस्ता सिमेंट काँक्रटीकरणात चौपदरी होणार असून त्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. निधी उपलब्ध होवून प्रत्यक्षात काम होण्यास उशीर असला तरी तोपर्यंत रस्ते दुरुस्ती चांगल्या पध्दतीची करण्याचे आश्वासन दिले.

ए व डी विभागात पायी चालणे अवघड
ए व डी. विभागात पायी चालणेही अवघड झाले असून रस्त्याची इतकी वाईट स्थिती आहे की वाहने चालविणे मोठे दिव्य आहे. या विभागातील रस्त्याची दुरुस्ती हाती घेण्याची मागणी करण्यात आली. या विभागासाठी टेंडर काढले असून महिनाअखेर अथवा आँक्टोबर अखेरपर्यंत याविभागातील रस्त्यांचे काम सुरु करण्याचे आश्वासन उपअभियंता भोसले यांनी दिले.

गटारींच्या प्रश्नावर उद्योजकांचा संताप
बी विभागात गटारीचा नामशेष झाल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी थेट कारखान्यात जाते. याचे व्हीडीओ उद्योजकांनी अधिकाऱ्यांसमोर दाखवले. स्वमालकीची कंपनी असून भाड्याच्या जागेत दुसरीकडे कामे करावी लागत असल्याची व्यथा मांडण्यात आली. गटारीवर अवैध व्यवसाय थाटले जात आहेत. त्यांच्याकडून उद्योजकांना धमक्या देण्याचे प्रकार घडत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यावर गटारी बुजावणाऱ्या उद्योजकांवर सक्त कारवाई करणार असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

Comments are closed.