नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात ट्रॅफिक कंट्रोल रूम सुरू झाली असून, शहरातील चाळीस सिग्नलवरील सीसीटिव्ही फुटेज तिथे दिसते. ‘ट्रीपल सीट वाहन चालवू नका’, ‘हेल्मेट वापरा’, ‘विरुद्ध दिशेने येऊ नका’ अशा प्रकारच्या सूचना पोलीस माईकमधून देत आहेत. येत्या काही दिवसांत सीसीटिव्हीद्वारे ई-चलन कारवाई देखील सुरू होणार आहे. सिग्नलवरील सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट दिसावे यासाठी पोलीस आयुक्तालयातील कमांड कंट्रोल रुममध्ये 6 बाय 4 फूटाची एलसीडी लावण्यात आली आहे. तेथे पाहून पोलीस बेशिस्त वाहन चालकांना सूचना देत आहेत. पोलिसांकडून थेट नाव पुकारण्यात येत असलेल्या वाहन चालकांवर वचक बसत आहे आणि चालक शिस्तीत वाहन चालवत आहेत.
५२६ कॅमेरे ठेवणार वाहनचालकांवर नजर
स्मार्टसिटी अंतर्गत नाशिक शहरात ८०० कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यापैकी ५२६ कॅमेरे पोलिसांसाठी असून, या कॅमेऱ्यांद्वारे पोलीस वाहनचालकांवर नजर ठेवत आहेत. यासाठी महिला अंमलदारांना स्मार्ट सिटी आणि आयुक्तालयाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.