जोहान्सबर्ग/एनजीएन नेटवर्क
चांद्रयान ३ च्या निमित्ताने भारताने आज इतिहास घडवला आहे. चांद्रयान २ अयशस्वी झाल्यानंतर चांद्रयान ३ कडे अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. संपूर्ण जगभरातून इस्रोच्या या कामगिरीकडे डोळे लागले होते. अखेर ६ वाजून ३ मिनिटांनी चांद्रयान ३ चंद्रावर लँड झाले. त्यामुळे समस्त भारतीयांची मने अभिमानाने आणि आनंदाने फुलून गेली आहेत. दरम्यान, चांद्रयान ३ यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढचा प्लान सांगितला आहे. चंद्रानंतर आता भारत आता थेट सूर्याचा अभ्यास करणार आहे.
आपण आपल्या सौरमंडळाच्या सीमांचे सामर्थ्य पाहणार आहोत. मानव जातीसाठी ब्रम्हांडाच्या अनेक संभावनांना साकार करण्यासाठी काम करणार आहोत. आपण भविष्यासाठी अनेक मोठे आणि महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठरवले आहेत. लवकरच सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी इस्रो आदित्य एल वन मिशन लॉन्च करणार आहे. यानंतर, शुक्रही इस्रोच्या लक्ष्यावर आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले.
“गगनयानच्या माध्यमातून Human Spaceflight Mission साठी पूर्ण तयारीशी सज्ज आहे. भारत आज सिद्ध करत आहे की स्काय इज नॉट दि लिमिट. विज्ञान आणि तंत्रज्ञान देशाच्या उज्ज्वल भविष्याचा आधार आहे. यामुळे आजचा क्षण मी नेहमीसाठी लक्षात ठेवणार आहे. हरल्यानंतरही जिंकायचं कसं असतं याचं प्रतिक आजचा दिवस आहे, असेही मोदी म्हणाले.