मुंबई/एनजीएन नेटवर्क
आमची अर्थव्यवस्था वाजवी गतीने वाढत आहे आणि जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि जागतिक विकासामध्ये सुमारे १५ टक्के योगदान देत असल्याची माहिती गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. आरबीआयच्या मते, भारत इतर देशांच्या तुलनेत जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यास अधिक सक्षम आहे. देशांतर्गत मागणीची परिस्थिती वाढीला पोषक आहे आणि ग्रामीण भागातही मागणी पुन्हा रुळावर आली आहे.
दास म्हणाले, जगातील सर्व आघाडीच्या रेटिंग एजन्सी आणि ब्रोकरेज कंपन्यांनी भारताच्या वाढीवर आधीच विश्वास व्यक्त केला आहे. आता आरबीआयनेही आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतात विकासाची अफाट क्षमता आहे. जागतिक स्तरावर भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने उदयास येत आहे. भारतातील कॉर्पोरेट क्षेत्र देखील चांगल्या स्थितीत आहे, विशेष म्हणजे ते अधिक चांगले केले जाऊ शकते. कंपन्यांच्या नफ्यात सातत्याने वाढ होत आहे. विशेषतः बँकिंग क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय बँकांनी गेल्या तिमाहीत चमकदार कामगिरी केली आहे.
जीडीपी वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवर कायम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. याशिवाय आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत वास्तविक जीडीपी दर ६.६ टक्क्यांपर्यंत असू शकतो, असा अंदाज वर्तवत केंद्रीय बँकेने पुन्हा एकदा महागाई हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगितले आहे. किरकोळ महागाईचा दर ४ टक्क्यांवर आणण्याचे आमचे उद्दिष्ट असले तरी वस्तुस्थिती उलट दिसून येत आहे. २०२३-२४ साठी किरकोळ महागाईचा अंदाज ५.१ टक्क्यांवरून ५.४ टक्के झाला आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरणाची द्विमासिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.