मुंबई/एनजीएन नेटवर्क
केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक मुंबईत गुरुवारी सुरु झाली. निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याची तयारी विरोधकांनी चालवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील लोकसभेच्या 450 जागांचे वाटप करण्याचा इंडिया आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. 2019 चे निवडणूक निकाल हा निकष ठरवून हा रनर अप फॉर्म्युला समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या फॉर्म्युल्यानुसार 2019 मध्ये जिंकलेल्या जागांवर तेच राजकीय पक्ष पुन्हा निवडणूक लढतील. म्हणजे ज्या पक्षाचा खासदार, ती जागा त्या पक्षाला मिळेल. तर, ज्या जागांवर गेल्यावेळी ज्या राजकीय पक्षाला दुस-या क्रमांकाची मतं मिळाली असतील, ती जागाही तोच पक्ष लढवेल. या रनर अप फॉर्म्युल्यावर इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत विचारविनिमय होणार आहे. त्यानंतर या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय होईल, असं सूत्रांनी सांगितले. हा रनरअप फॉर्म्युला लागू केला, तर कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा मिळू शकतात हे देखील विचारात घेण्यात आले आहे.
महाराष्ट्रात काय असणार स्वरूप ?
गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले, तर 3 जागी शिवसेना उमेदवार दुस-या स्थानी होते. राष्ट्रवादीचे 4 खासदार विजयी झाले, तर 15 जागी राष्ट्रवादी उमेदवार दुस-या जागी होते. याचाच अर्थ शिवसेनेच्या वाट्याला 21, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 19 जागा येतील. सध्या राज्यात केवळ एकच खासदार असलेल्या काँग्रेसच्या वाट्याला केवळ 8 जागा येतील.