भारताच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडने गुडघे टेकले
लंडन : एनजीएन न्यूज नेटवर्क
केनिंग्टन ओव्हल मैदानावर रंगलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवत मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. इंग्लंडसमोर 374 धावांचे विशाल लक्ष्य होते. पण हॅरी ब्रूक आणि जो रूट या दोघांनी मिळून इंग्लंडच्या विजयाच्या आशा प्रबळ केल्या. दोघांनीही शतके ठोकून सामना भारतासमोर आव्हान उभे केले होते. पण शेवटी भारताच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंड संघाने गुडघे टेकले. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या जोडीने शेवटच्या सत्रात माऱ्याची धार वाढवली आणि इंग्लंडचा डाव 367 धावांवर आटोपला.
या विजयाने भारताने केवळ सामना नव्हे, तर मालिकाही वाचवली. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची आवश्यकता होती आणि भारताला चार विकेट्सची आवश्यकता होती. आज सिराजने 3 विकेट्स घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट्स घेतली. ओव्हलच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडियाने मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर रोमांचक सामन्यात इंग्लंडकडून विजय हिसकावून घेतला. ओव्हल कसोटी 6 धावांनी जिंकली. सिराजने दुसऱ्या डावातील 5 विकेटसह सामन्यात 9 विकेट घेतल्या आणि टीम इंडियाच्या विजयाचा स्टार बनला. यासह, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 5 कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवली.
Comments are closed.