चेन्नई/एनजीएन नेटवर्क
विश्वचषक २०२३ मधील पाचव्या सामन्यात आज यजमान भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गाडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय गोलंदाजापुढे ऑस्ट्रेलियाने केवळ १९९ धावांत लोटांगण घातले. त्यानंतर भारताची सुरुवात खूपच खराब झाली असती. दोन धावांवर तीन विकेट्स अशी असताना विराट कोहली आणि के.एल. राहुल यांनी अडचणीतून बाहेर काढत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या दोघांनी १६५ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या दिशेने नेले. सहा गडी राखून भारताने स्पर्धेचा विजयाने श्री गणेशा केला आहे.
या सामन्यात भारताच्या विजयाचे नायक लोकेश राहुल आणि विराट कोहली होते. मात्र, दोन्ही फलंदाजांचे शतक हुकले. राहुलने ९७ धावांची नाबाद खेळी तर कोहलीने ८५ धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय फक्त हार्दिक पांड्याला खाते उघडता आले. त्याने ११ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे जोश हेझलवूडने तीन आणि मिचेल स्टार्कने एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४६ धावा केल्या. वॉर्नरनेही ४१ धावांची खेळी खेळली. अखेरीस स्टार्कने २८ धावांचे योगदान दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. या सामन्यातील विजयासह भारताने दोन महत्त्वाचे गुण मिळवले आहेत. टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आली आहे. भारताचा पुढील सामना ११ ऑक्टोबरला अफगाणिस्तानशी होणार आहे.