नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महावितरणच्या सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना उत्कृष्ट व अखंडित वीज सेवा देण्याबरोबर दिलेल्या वीज देयकाची १०० टक्के दरमहा वसूली करणे सुद्धा अत्यावश्यक आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना दिलेल्या प्रत्येक युनिटच्या वीज देयकाच्या थकबाकीची वसुली अत्यावश्यक असून वीज ग्राहकांना अखंडित वीज सेवा देण्यासोबतच या महिन्यात थकबाकीदार ग्राहकांकडे असलेली वीज देयक थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविण्याचे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक(प्रकल्प) दत्तात्रय पडळकर यांनी दिले.
महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र एकलहरे येथील सभागृहात नाशिक व मालेगाव मंडळातील सर्व कार्यकारी अभियत्यांची व अधिकाऱ्यांची आज शुक्रवारी (दिनांक १२ सप्टेंबर) रोजी आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
नाशिक परिमंडलामध्ये वसुलीसाठी उपविभागनिहाय पथके तयार करून वापरलेल्या विजेचे देयक न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित करण्याचे तसेच सोबतच वीज पुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदार ग्राहकांच्या जोडणीची तपासणी करून, थकबाकी न भरता अनधिकृत वीज जोडणी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कार्यकारी संचालक पडळकर यांनी दिले.
बैठकीला महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधिक्षक अभियंता जगदीश इंगळे उपस्थित होते.
बैठकीमध्ये विविध विषयांचा व योजनांचा संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून सविस्तर आढावा त्यांनी घेतला. महावितरण पुनर्रचना आराखडा सादरीकरण करीत याबाबतची सविस्तर माहिती कार्यकारी संचालक पडळकर यांनी या बैठकीत दिली. वीज जोडणी तथा इतर सर्व सेवा ग्राहकांना तत्काळ व ठराविक वेळेतच दिल्या गेल्या पाहिजेत, यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक महिनाअखेर सर्वानी वीजदेयकाची शून्य थकबाकी मोहीम यशस्वी करून, वीज चोरीला आळा घालण्यासाठी सामूहिकपणे गतिमानतेने व कार्य करण्याचे आवाहन कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी केले. बैठकीला नाशिक व मालेगाव मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.