दिंडोरी/एनजीएन नेटवर्क
तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, माता-पित्यांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना कोणत्याही प्रकारचे दाखले अथवा योजनांचा लाभ न देण्याचा ठराव करण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. सदर ठरावाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच सुभाष नेहरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली असता ग्रामविकास अधिकारी शैलेंद्र नरवाडे यांनी इतिवृत्त वाचून कायम केले. आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांचा विषय ग्रामसभेत निघाल्यावर अशा मुलांच्या वागणुकीविषयी सर्वांनीच संताप व्यक्त केला. अशा मुलांना ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतेही शासकीय दाखले न देण्याचा तसेच शासकीय योजनांचा लाभ न देण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. ग्रामसभेचा हा ठराव पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.