सातपूर महाविद्यालयात नवउद्योजक कार्यशाळा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या नव कल्पनांना प्रत्यक्ष कृतीची जोड द्यावी, यातूनच नव उद्योजक घडतो, असे प्रतिपादन नॅशनल बोर्ड फॉर एमएसएमईचे प्रदीप पेशकार यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सातपूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ- विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत ‘नव उद्योजक’ एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून आनंद ॲग्रो संचालिका वैशाली अहिरे उपस्थित होत्या.
प्रदीप पेशकार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत उद्योजक होण्यासाठी लोकांची गरज, नवकल्पना, संधी, आत्मविश्वास, परिवार सपोर्ट, कौशल्य, मनुष्यबळ आणि भांडवल या सर्व गोष्टींची महत्त्वपूर्ण भूमिका समजून सांगितली. उद्योग उभा करण्यासाठी सर्वात पहिले पैसा/भांडवल याऐवजी आपली मानसिकता किती महत्त्वाची असते, याची जाणीव करून दिली. उद्योगासाठी शासन दहा हजारांपासून एक कोटीपर्यंत आर्थिक मदत करते, या मदतीचा लाभ घेत नवउद्योजक होण्याचे आवाहन त्यांनी केले.
वैशाली अहिरे यांनी आनंद ॲग्रोची सुरुवातीपासूनची वाटचाल ते एक हजार कोटींपर्यंतच्या उलाढालीचा प्रवास सांगितला आणि आपल्यातील उद्योजक घडवण्यासाठी तरुणांनी कोणकोणत्या गोष्टी जीवनात आणाव्यात, याविषयी मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. राहुल पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सांगितले की, नवउद्योजक म्हणून सिद्ध होण्यासाठी हेच योग्य वय आहे. याच वयात तुम्ही भोवतालच्या संधी ओळखून छोटा-मोठा व्यवसाय सुरू करू शकतात. या वयात व्यवसाय सुरू करण्यात जास्त जोखीम नसते, उलट अनुभवातून शिकण्यास आणि प्रगती करण्यास खूप वाव मिळतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज एक सफल उद्योजक होते. यादृष्टीने इतिहासाचा अभ्यास करून त्यातूनही प्रेरणा घ्यावी, असे आवाहन अध्यक्षीय मनोगतातून केले.
कार्यशाळेचे संयोजन विद्यार्थी विकास मंडळाच्या समन्वयक डॉ. सुरेखा गायकवाड आणि आयक्यूएसी प्रमुख प्रा. एस. बी. गांगोडे यांनी केले. प्रा. रामेश्वर उगले यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. ए. बी. शिंदे यांनी आभार मानले.
नव उद्योजक कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.
———————————
Comments are closed.