नाशिक/एनजीएन नेटवर्क
येवल्यातील शनिवारच्या सभेमध्ये शरद पवारांनी माफी का मागितली, हे मला कळलेच नाही. सगळ्या सभा रद्द करताना येवल्यातील सभा मात्र कायम ठेवली. मी ओबीसी नेता आहे, म्हणून ते इथे पहिल्यांदा आले. मला वाईट वाटले की तुम्ही माफी मागता. किती ठिकाणी माफी मागणार आहात? गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत, पुण्यापासून बीडपर्यंत आणि खाली लातूरपर्यंत माफी मागणार आहात का? काय केले मी, असा सवाल छगन भुजबळ यांनी शरद पवारांना विचारला आहे. येवला मतदारसंघ मी स्वतःहून मागून घेतला, मला देण्यात आला नव्हता. ते नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
माझा अंदाज फारसा चुकत नाही. पण इथे माझा अंदाज चुकला. माझ्या विचाराला तुम्ही साथ दिली. मात्र, माझ्या निर्णयामुळे तुम्हाला यातना झाल्या, असे शरद पवार येवल्याच्या सभेमध्ये बोलले होते. पवारांनी सभेत माफी मागितल्याने भुजबळांनी उपरोक्त उद्विग्न प्रतिक्रिया दिली.
येवला मागितले, दिले नाही
भुजबळ यांचे आपणच येवल्यात राजकीय पुनर्वसन केले, या वक्तव्यावर भुजबळ यांनी भाष्य केले. ते म्हणाले, येवल्याशी माझा खास संबंध नव्हता. एकदा राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचाराला तिथे गेलो होतो. परंतु, येवलावासियांनी एक मुद्दा मांडला. आमच्या तालुक्यात दुष्काळ आहेच, पण विकासही झालेला नाही. आम्हाला विकासासाठी तुम्ही पाहिजे आहात. येवलावासियांचे म्हणणे ऐकल्यानंतर मी पवारांना सांगितलं की जुन्नरचा चांगला विकास झाला आहे. मला काम करण्याची संधी येवल्यात आहे. मी येवल्याची निवड केली आहे. त्यामुळे येवला मी स्वतःहून मागून घेतला, मला देण्यात आला नव्हता. येवल्यात शिवसेनेचे उमेदवार होते. तेथे रिस्क होतीच. परंतु, संघर्ष केला, तिथल्या लोकांनी प्रेम दिलं आणि निवडून दिले. शरद पवारांचे सर्व आरोप आज छगन भुजबळांनी खोडून काढले.
तेव्हा कौतुक, आता माफीनामा
येवल्यातील जनतेने मला तब्बल चार वेळा निवडून दिले. एखाद्याला आपण एकदा निवडून येतो. पण काहीतरी प्रेम असेल तरच चार वेळा निवडून येतो. पण पवार म्हणाले की २० वर्षांपूर्वी चुकीचा उमेदवार दिला. प्रशासकीय संकुलातील उद्घाटनात मात्र ते म्हणाले होते की बारामतीनंतर कोणाचा विकास झाला असेल तर येवल्याचा झाला. पण आता त्यांनीच माफी मागितली, असेही छगन भुजबळ म्हणाले