अहमदनगर/एनजीएन नेटवर्क
जिल्ह्यातल्या चौंडीत सुरू असलेले यशवंत सेनेच्या आंदोलकांचे आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश आले आहे. धनगरांच्या एसटी आरक्षणासाठी सुरेश बंडगर आणि आबासाहेब रुपनवर हे 21 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते.
मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांशी फोनवरून संवाद साधला. यानंतर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना त्यांची भेट घेण्यासाठी पाठवले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी त्यांनी 50 दिवसांत धनगर आरक्षणावर तोडगा काढणार असल्याची ग्वाही गिरीश महाजन यांनी आंदोलकांना दिली. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी गेल्या 20 दिवसांपासून उपोषण सुरू होते. आंदोलनातील दोन जण आमरण उपोषण करत होते. त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य पथक पाठवल होते.